Breaking News

तहसिलच्या आवारातूनच जप्त मालाची चोरी


नेवासा, तहसील आवारातून महसूलच्या कर्मचार्‍यांनी जप्त केलेले वाळूचे दोन टेम्पो वाळूसह 7 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून पळवून नेण्यात आला आहे.. याबाबतची फिर्याद नेवाशाचे कामगार तलाठी गोरक्षनाथ भालेराव यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली आहे. नेवासा मंडलाधिकारी डी. पी. साळवे, भेंडा तलाठी व्ही के जाधव यांनी 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता एम एच 4 बी जे 1298 या नंबरचा 709 टेम्पो 2 ब्रास वाळूसह पकडला होता. तसेच 26 मार्च रोजी कामगार तलाठी भालेराव आणि बालाजी मलदोडे यांनी ज्ञानोदय हायस्कूल जवळ 2 ब्रास वाळूसह एम एच 11 टी 1533 नंबरचा 407 टेम्पो पकडला होता.

23 तारखेला पकडलेला टेम्पो तहसील आवारात आणून उभा केला होता व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची होती. परंतु कार्यालयास दोन दिवस सुट्टी असल्याने सदरचे कर्मचारी कार्यालयात आलेच नाही. 26 तारखेला दुसरी गाडी जप्त करून ते कार्यालयात आले असता सदरचा टेम्पो त्यांना उभ्या असलेल्या जागी दिसला नाही. तर 26 तारखेला आणलेला टेम्पो तहसील कार्यालयात आणून उभा केला होता व तहसील कार्यालयात रिपोर्ट देण्यासाठी गेल्यावर टेम्पोचे फोटो काढण्यासाठी बाहेर आले असता सदराचा टेम्पोही चोरून नेल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन्हीही टेम्पोमधील 1 लाख रुपयांची 4 ब्रास वाळू व दोन्हीही टेम्पोचे प्रत्येकी 3 लाख रुपये असा 7 लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. सदरच्या टेम्पोचे चालक निलेश पिटेकर व सागर लष्करे यांच्या नावानिशी सदरचे दोन वाळू भरलेले टेम्पो दंडात्मक कारवाई टाळण्याच्या उद्देशाने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. प्रवरा गोदावरीच्या नदीपात्रातून होणार्‍या वाळू तस्करीच्या विरोधात नेवासा महसूल कडून सध्या जोरदार कारवाई चालू आहे पण सदरच्या घटनेमुळे महसूल कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.