श्रीरामपुर शहरासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची मागणी
धरणातून पाणी सोडल्यानंतर श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करणार्या साठवण तलावात प्रवरा डावा कालव्यातून पाण्याबरोबर केर कचरा , पाटातील मलमूत्र , घाण , प्लास्टिक पिशव्या , सांडपाणी , मृत जनावरे , हाडे , पाटालगतच्या रहिवाशांनी पाटात सोडलेले सांडपाणी , बाथरूमचे पाणी अशी सर्व घाण तलावात येत असल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव घाण पाणी प्यावे लागते. थेट धरणातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे साठवण तलावात पाणी आणल्यास कालव्यातून तलावात होणार्या घाण पाण्याच्या प्रवासापासून नागरिकांची सुटका होऊन लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकते.
नगरपालिका निवडणुकी दरम्यान महाआघाडीने धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणून जनतेला शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले होते. पालिका प्रशासन व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास श्रीरामपूरकरांना स्वच्छ पाणी पुरवठा होऊ शकतो. श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या जुन्या साठवण तलावाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी अस्तरीकरणचे काम चालू आहे. गोंधवनी येथील नवीन साठवण तलावातून नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. या नवीन साठवण तलावात धरणातून पाणी सोडल्यानंतर कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. कालव्यातून पाणी सोडल्यानंतर अशा सर्व घाण पाण्यावर स्वच्छतेची प्रक्रिया करून ते पाणी नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.
पाणी स्वच्छ केले तरी पाण्यातील घाणीचा काही अंश तसाच राहतो किंबहुना स्वच्छ केलेले पाणी कितपत स्वच्छ असेल. ? असे घाण पाणी श्रीरामपूरकर पीत असल्यामुळे नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. नवीन साठवण तलावाजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. संरक्षक भिंतीजवळ घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाण्याच्या टाकीजवळ प्रवेशद्वारालगतची संरक्षक भिंतही तुटली असून आजूबाजूला सर्वत्र अस्वच्छता आहे. तलावात चपला ,प्लास्टिक पिशव्या , घाण, चिंध्या , कापडे आदी घाण जमा झालेले आढळली. अशा पद्धतीने सर्व घाण पाण्याचा मैला पाटातून साठवण तलावात जात असतो. असे घाण पाणी श्रीरापूरवासियांना प्यावे लागत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
नागरिकांना घाण पाण्यामुळे आजारांना सामोरे जावे लागल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. प्रवेशद्वाराजवळ संरक्षक जाळीतून आत जाण्यासाठी जागा करण्यात आली असून त्यातून कुणीही आत जात असते. तलावाजवळ सुरक्षारक्षकही आढळला नाही. पाटातून येणार्या घाण पाण्याच्या मैल्यापासून नागरिकांची सुटका होऊन लोकांना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणणे गरजेचे आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणल्यास श्रीरामपूरवासियांना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन पाण्याचीही मोठी बचत होईल. थेट धरणातून पाईपलाईनद्वारे साठवण तलावात पाणी आणण्यासाठी पालिका प्रशासन व पदाधिकार्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.