Breaking News

दुचाकी रॅलीत उत्स्फूर्त तरुणाई संगमनेर झाले भगवेमय


छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार होणारी शिवजयंती रविवारी {दि. ४} मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसोबतच शहर व उपनगरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले होते.
शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने चंद्रशेखर चौकातून काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीत सिनेअभिनेता अंकुश चौधरी व सातारा श्री पै. सागर शिंदे हे सहभागी झाले होते. ही रॅली शहर व उपनगरातील प्रमुख मार्गावरुन नेण्यात आली. रॅलीचे अनेक ठिकाणी मंडळांनी जंगी स्वागत केले. अभिनेता चौधरी व सातारा श्री पै. शिंदे यांना पाहण्यासाठी संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. 

शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे खांडगाव फाटा येथे स्वागत करण्यात आले. संध्याकाळी पाच वाजता नगरपरिषदेपासुन प्रारंभ झालेल्या शिवसेनेच्या पारंपारिक मिरवणुकीत शिवजयंती उत्सव युवक समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे, सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक गोपाल उंबरकर, पंकज निकम, अरूणसिंग परदेशी आदींच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.