Breaking News

उंदीर सरकारचे सिंहासनही पोखरतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी सरकारच्या पारदर्शक कारभाराची चांगलीच चिरफाड केली. उंदीर प्रकरणांवर भाष्य करतांना विखे पाटील म्हणाले की, उरलेले उंदीर आगामी 2019 च्या निवडणुकीत सरकारचे सिंहासन पोखरून टाकतील, असा इशारा, विखे यांनी दिला. यावेळी विखे पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे मंत्रालयात मारल्या गेलेल्या 3 लाख 19 हजार 400.57 उंदरांबाबत बोलले. पण, अजूनही राज्यात काही उंदीर शिल्लक असल्याने नवे टेंडर देत आहे. मेलेल्या 3 लाख 19 हजार उंदरांव्यतिरिक्त आजही अनेक उंदीर मंत्रालयात हैदोस घालीत आहेत. तर काहींचा महापालिकेत सुळसुळाट आहे, असे वक्तव्य करताच सभागृहात सत्ताधारी आमदारांनीही हसू आवरले नाही.

पुढे त्यांनी मिश्किलपणे उंदरांच्या प्रकृतीचा उल्लेख केला. या उंदरांमध्ये काही सुष्ट आहेत, काही पुष्ट आहेत, तर काही दुष्ट आहेत. काही उंदीर बेडकीसारखे फुगून मस्तवाल झाले आहेत, तर काही अगदीच कृश आहेत. काही उंदीर हे इतर मस्तवाल उंदराकडे पाहून नुकतेच जन्माला आले आहेत. तर काही उंदीर उंदरींच्या उदरातून जन्म घेऊ पाहत आहेत. अशा उंदरांचे निर्मूलन करण्यासाठीचे हे टेंडर आहे. भ्रष्टाचार मंत्रालयात कसा बोकाळला आहे, हे सांगण्यासाठी पाटील यांनी उंदरांचा उल्लेख केला. विशेष म्हणजे पाटील यांच्या भाषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभागृहात उपस्थित होते. त्यांनीही या मिश्किल भाषणाला दाद दिली. काही उंदीर हे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निधी कुरतडत आहेत. यातले काही उंदीर अन्न व नागरी पुरवठा विभागातही आहेत. तिथे ते जनतेच्या धान्यावर तूर, तांदूळ, गहू, सोयाबीन, कापसावर ताव मारीत आहेत.
मूषक हे वाहन असलेल्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना वाजतगाजत पुण्यात होत असली आणि तो बहुमान सर्वप्रथम पुण्याचा असला तरी पुण्यातील काही उंदीर बुद्धिमान आहेत आणि बेरकेही आहेत. या उंदरांना पकडायला गेले की, ते लगेच पुणेरी पगडीखाली लपून बसतात असे म्हणतात, यावर मुख्यमंत्र्यांसह पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटही खदखदून हसले. इथल्या उंदरांचा धोका पेशवाईत ’नाना फडणवीसां’नाही झाला होता. हा धोका ओळखून आजच्या ’फडणवीस’ सरकारने तातडीने या चतूर उंदरांना जेरीस आणण्याची गरज आहे. काही उंदरांनी पकडले जाण्याच्या भीतीने जलयुक्त शिवारच्या जलसाठ्यात उडया घेतल्यात. आता या जलयुक्त शिवारच्या जलसाठ्याला मेलेल्या उंदरांचा येणारा कुबट वास असह्य झाला आहे. काही उंदीर चंद्रकांत पाटील यांच्या ’खड्डेमुक्त महाराष्ट्रा’च्या खड्यात दडून बसले आहेत. यातील काही उंदीर आता वृध्द झाले आहेत. कुरतडण्याच्या कामातून निवृत्त झाले असले तरी राजकीय पाठबळ असल्याने ते पुन्हा पुन्हा हैदोस घालतच आहेत. त्यातला एक उंदीर ’समृद्धी महामार्गा’वर फिरतो आहे, तर दुसरा ’मुंबई महापालिके’ वर आहे. काही उंदरांना तर, पोलिसांचाही धाक उरलेला नाही. या उंदरांनी पोलिसांची रक्षा जाकिटेही कुरतडली आहेत, अशा प्रकारे विखे पाटील यांनी सरकारचा कारभार मुषख्यानाद्वारे सभागृहात सांगितला.