Breaking News

कुळधरणच्या प्रा. विजय पवार यांना बीडच्या शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदाचा मान

येथील अनेक भुमिपुत्रांनी आपल्या कार्यातून राज्यात आपला नावलौकिक प्राप्त केला. जिद्द, चिकाटी, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर कुळधरणचे नाव विविध क्षेत्रात उज्वल होत आहे. कुळधरणच्या जगदंबा देवी दसरा उत्सवातून धडे घेत येथील भूमिपुत्र सार्वजनिक उत्सवातुनही आपले कर्तृत्व सिध्द करीत आहेत. प्रा. विजय दादासाहेब पवार यांनी बीड शहरातील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद भूषवून राज्यातील लोकांचे आकर्षण असलेल्या उत्सवाला वैचारिक जोड देत यशस्वी आयोजन केले. त्यांच्या या कार्याबद्दल कुळधरणसह पंचक्रोशीतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच प्रबोधनाचे कार्यक्रम नेटके आणि चोख नियोजन पूर्ण बीड शहरात फडकणार्‍या भगव्या पताका...महिलांची लक्षणीय उपस्थिती...जवळपास सात तास चाललेला शिस्तबध्द मिरवणूक सोहळा अशा अनेक वैशिट्यांसह बीड शहरातील जयंती उत्सव हा लोकोत्सव झाला. प्रा. विजय पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नियोजनामुळे व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा जयंती उत्सव संपूर्ण राज्यभरासाठीच एक आदर्श ठरला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. सकाळी शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी अभिवादन केले. जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर आणि सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन महिन्यांपासून या सोहळ्याची तयारी सुरू होती. प्रा. विजय पवार यांच्यासह संदीप क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर रस्त्यावर उतरून मिरवणुकीच्या व्यवस्थापनात सक्रिय होते. शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेले प्रा. विजय पवार यांच्या पुढाकारातून शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीपूर्वी निघालेली मोटारसायकल रॅली असो की त्यानंतरची मिरवणूक या सर्व ठिकाणी शिस्तीचे कमालीचे पालन केले जात होते. 
छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुकीतील मुर्ती एक वेगळेच आकर्षण ठरले. मिरवणुकीसाठी मुर्तीसह ट्रक पुण्याहून सजवुन बीड येथे आणण्यात आला. मिरवणुकीतील कलाकारांनी सादर केलेले देखावे आणि विविध नृत्य प्रकारालाही लोकांची पसंती मिळत होती. हे देखावे आणि कलाप्रकार पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर खास गॅलरीही तयार करण्यात आली होती.