Breaking News

केंद्रसरकारकडून निराशा : चंद्राबाबू नायडू

अमरावती : केंद्र सरकारकडून आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या गेल्या नाहीत, असे मत तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात नायडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली. टीडीपीचे अध्यक्ष नायडू यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की संपुआ सरकारकडून आंध्र प्रदेशवर विभागणीच्या वेळी झालेल्या अन्यायाला न्याय मिळेल या अपेक्षेसह टीडीपीने रालोआला पाठिंबा दिला. परंतु युतीमुळे आपला उद्देश सफल न झाल्याने आपण युती तोडण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मते, भाजप राज्यातील लोकांच्या अपेक्षांच्या प्रति असंवेदनशील आहे, असे आंध्र प्रदेशला वाटत आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र शासन आंध्र प्रदेश नोंदणी कायदा, 2014 मधील तरतुदींचा अवलंब करण्यास व विशेष राज्याचा दर्जा यासारखी आश्‍वासने पाळण्यास इच्छुक नव्हते, असे नायडू यांनी सांगितले. राज्याला विशेष राज्य दर्जा देण्याच्या मागणीसाठी आपण 29 वेळा दिल्लीला गेलो, परंतु प्रत्येक वेळी फक्त आश्‍वासने घेऊन परत यावे लागले, असे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशच्या समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांना होती. परंतु तीदेखील पूर्ण न झाल्याने त्यांनी भाजपपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.