Breaking News

प्रवासी महिलेची दागिन्यांची बॅग परत; रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा


प्रवासी महिलेची ऑटो रिक्षामध्ये राहिलेली दागिन्यांची बॅग ऑटोचालकाने प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनमध्ये आणून दिल्याने त्या ऑटो चालकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असलेल्या साजिदा बी अहमद रशीद ह्या काही कामनिमित्त अमरावती येथे आल्या होत्या. परतीच्या प्रवासाकरीता त्या नागपुरी गेट येथून शेख वाजीद शेख अजीज याच्या ऑटोमध्ये बसल्या मात्र त्यांची 20 ग्रामचे दागिने व 3 हजार रोख रक्कम असलेली बॅग त्या ऑटोमध्ये विसरल्या. बॅग ऑटोत राहिल्याचे लक्षात येताच त्यांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. प्रवासी महिला आपल्या ऑटो रिक्षा मध्ये बॅग विसरल्याचे लक्षात येताच ऑटोचालक शेख वाजीद यांनी ती दागिन्यांची बॅग प्रामाणिकपणे नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केली. पोलिसांनी दागिने व रक्कम तपासून संबंधित महिलेला सुपूर्द केली. तसेच ऑटोचालक जिद याचा पोलीस निरीक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी देऊ केलेले बक्षीसही शेख वाजिद यांनी नम्रपणे नाकारले. एरवी ऑटोचालकांकडून येणारे अनुभव पाहता शेख वाजिद यांची कृती ही निश्‍चितच कौतुकास्पद आहे.