Breaking News

‘साकरवाडी’त कर्तबगार महिलांचा सन्मान


कोपरगाव /प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिलादिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक अशोकराव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रूपाली विसपुते होत्या.

प्रारंभी महिलादिनानिमित्त कर्तबगार महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. निर्मला राजगुरू यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थीनींनी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची वेशभूषा सादर केली. ‘बालकांचे शिक्षण व आरोग्य यात महिलांची भूमिका’ या विषयावर विशाखा निळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी परिसरातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

महिलादिनानिमित्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जालिंदर अहिरे यांनी नवीन महिला मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप केले. सूत्रसंचालन प्रांजली मोरे यांनी केले. निवृत्ती गोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद दारंकुडे यांनी परिश्रम घेतले.