नवी दिल्ली : देशात विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होण्याचे प्रकार वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा घटनांवर दुःख व्यक्त केले आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, अशा घटना घडणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना संपर्क साधून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे प्रकार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याच्या सूचना केल्यात. भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला हा इशाराच मानला जात आहे. त्रिपुरा येथे लेनिन यांचा पुतळा पाडल्याची घटना ताजी असतानाच आता कोलकात्यामध्ये भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेकही झाली. पुतळ्याला काळे देखील फासण्यात आले. यात पुतळ्याचे नुकसान झाले आहे. शिवाय, या घटनेमुळे कोलकात्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाने या घटनेचा निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.माकपची त्रिपुरातील 134 कार्यालये फोडून आतील सामान लुटले आहे. 64 कार्यालयांना आगी लावल्या आणि सुमारे 90 संघटनांच्या कार्यालयांचा ताबा भाजपा व आयपीएफटीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, असे माकपचे नेते बिजन धर यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या 514 कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, कार्यकर्त्यांच्या 1539 घरांची नासधूस तर 196 कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. हिंसाचारानंतर श्रीनगर, लेफुंगाख, मंडई, आमतली, मोहनपूरसह दक्षिण त्रिपुरात काही भागात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत.
पुतळा तोड-फोड प्रकरणी पंतप्रधानांची नाराजी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:54
Rating: 5