Breaking News

फुले दांपत्यांच्या विचारांची कास धरु या : ना. नाईक-निंबाळकर

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव आणि महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण ही दोन्ही ठिकाणे आमच्यासाठी  श्रध्दास्थाने आहेत. फुले दांपत्य ही देशाची संपत्ती असून सक्षम समाजासाठी त्यांच्या विचारांची कास धरु या, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे  नाईक-निंबाळकर यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी  नायगाव येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत  शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कर्जतचे  नगराध्यक्ष नामदेव राऊत उपस्थित होते.
सुरुवातीला सभापती नाईक-निंबाळकर, जलसंधारण मंत्री शिंदे, पालकमंत्री शिवतारे यांनी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात
ना. नाईक-निंबाळकर म्हणाले, महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ब्रिटीशांच्या राजवटीत मांडलेले विचार क्रांतिकारी होते. पुण्यासारख्या  तत्कालीन कर्मठ विचारांच्या समाजात फुले दांपत्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलले. त्यांचे हेच विचार पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजेत. त्यासाठी समग्र फुले  वाड्:मय वाचले पाहिजे. महिला जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. ज्या हिंमतीने सावित्रीबाई फुले क्रांतिकारी विचाराने बाहेर पडल्या,  तीच हिंमत महिलांनी बाळगली पाहिजे. तरच खर्‍या र्अने महिलांना स्थान मिळेल.
जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले, नायगाव हे प्रेरणास्थान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले  मांडलेले आदर्श विचार अंगीकारणे हे सर्वांत महत्वाचे आहे.  नायगावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. 1 कोटी 86 लाखाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भविष्यातही नायगावच्या विकासासाठी मी सकारात्मक  असेन, असे आश्‍वासन त्यांनी शेवटी दिले.
महिलांना शिक्षण मिळावे, समाजातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा वाटा असावा यासाठी 125 वर्षापूर्वी असणार्‍या रुढीवादी, परंपरावादी समाजात फुले दांपत्यांनी  चळवळ सुरु केल्याचे सांगून पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, बाल विवाह, विधवांचे केशवपन, बालसंगोपन केंद्र आदीविषयी क्रांतीकारक पाऊल उचलून  महिलांच्या मुक्तीचा मार्ग दाखवून त्यांना मान, सन्मान दिला. पाणी आडवा, पाणी जिरवा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे, व्यावसायिक शिक्षणाची मागणी,  शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी महात्मा फुले यांनी केल्याचे पहायला मिळते. फुले दांपत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण  केले. महिला पंतप्रधान झाली, जिल्हा परिषद अध्यक्ष झाली परंतू आजही सावित्रींच्या लेकींचा जेवढा सन्मान व्हायला पाहिजे तेवढा होत नाही, यासाठी त्यांचे  विचारच तुम्ही आम्ही रुजविले पाहिजेत, अंगीकारले पाहिजेत. सक्षम समाज घडवायचा असेल त्यांचे विचार अभिवादनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत  आणावेत, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी आमदार मकरंद पाटील, उपसभापती सारिका माने, जिल्हा परिषद स्वाती भरदाडे, नामदेवराव मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. चित्रकला स्पर्धे विजेत्या  विद्यार्थींनीना, आयएसओ मानांकन मिळालेल्या प्राथमिक शाळा यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या  माध्यमातून सातबार्‍यावर नाव लागलेल्या महिलांना सातबार्‍यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनी तर सरपंच मनोज नेवसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्यातून मोठ्या संख्येने  नागरिक उपस्थित होते.