Breaking News

नाशिक जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील विविध समस्यांचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नाशिक जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक‍ झाली. जिल्हा रुग्णालयात आवश्यक असणारी औषधे, रिक्त पदांची भरती, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली.

विधिमंडळातील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल आहेर, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, हेमंत टकले, पंकज भुजबळ उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. औषधांची उपलब्धता नसल्यास त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक स्तरावर खरेदी करावी. औषधांवाचून रुग्णांना परत पाठवू नये, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सुपरस्पेशालिटीमधील विविध सुविधांचा आढावा घेताना या ठिकाणी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.