Breaking News

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुला योजना अडचणीच्या गर्तेत!


सर्वांना घर मिळावे, हा उद्देश ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेत ज्या लाभार्थ्याला स्वतःची जागा नाही, अशा पात्र लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेच्या माध्यमातून ५० हजार रु. पर्यंतचे अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला. मात्र या योजनेंतर्गत घरकुलासाठी ५०० चौरस फूट विकत जागा घेण्याची तरतूद या निर्णयात आहे. मात्र एक दोन घरकुलासाठी कोणी जागा विकण्यास तयार होत नाही आणि विकत घेतलेल्या तुकड्याची तुकडाबंदी कायद्यामुळे नोंद करता येत नाही. शहर व उपनगरांलगत वाढलेल्या जागांचे भाव यामुळे या योजनेचा हेतूच सफल झाला नाही, असेच म्हणावे लागेल. या योजनेअंतर्गत राहाता पंचायत समिती अंतर्गत फक्त एकाच लाभार्थ्याचा प्रस्ताव राहाता पंचायत समितीकडे आला आहे. ५० हजारांच्या रक्कमेत जागा खरेदीच होऊ शकत नाही. त्या भावात जागा मिळू शकत नाही, हीच मोठी अडचण या योजनेला असून त्यामुळे यासाठी इच्छा असूनही काही जणांनी प्रस्तावच दाखल केलेले नाहीत. राहाता तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरकुल बांधणीसाठी अनुदान वितरित करण्यात आले. अनेकांची घरे पूर्ण झाली. मात्र ज्यांना स्वमालकीची जागाच नाही, अशांना मात्र फटका बसला, हे नाकारता येणार नाही. ग्रामीण भागात स्वतःची जागा नाही, असे अनेक कुटुंब शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहतात. जवळपास जागा उपलब्ध नाही व सरकार देत असलेल्या पैशात जागा खरेदी करता येत नाही. यामुळे घरकुलाचा लाभ मिळविताना केवळ जागा नाही, म्हणून अनेकांची अडचण झाली आहे.