Breaking News

स्थायीच्या अध्यक्षपदी ममता गायकवाड

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी झाल्या आहेत. गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांचा 7 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भाजपला 11 तर राष्ट्रवादीला 4 मते मिळाली. दरम्यान शिवसेना या निवडणुकीत तटस्थ राहिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक झाली. भाजपकडून ममता गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोरेश्‍वर भोंडवे रिंगणात होते. गायकवाड यांना 11 मते मिळाली. तर, भोंडवे 4 यांना मते मिळाली. शिवसेना तटस्थ राहिली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी गायकवाड यांचा 7 मताने विजय झाल्याचे जाहीर केले. स्थायीत भाजपचे 10 आणि एक अपक्ष असे 11 सदस्य आहेत. तर, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचा 1 असे एकूण 16 सदस्य आहेत. स्थायीत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष होणार हे निश्‍चित होते. परंतु, स्थायीची उमेदवारी नाकारल्यावरुन शहराचे दुसरे कारभारी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यांनी बंड करत स्थायी सदस्यत्वाचे राजीनामा देऊ केले होते. त्यामुळे या बंडखोरीचा लाभ होईल, या उद्देशाने 4 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या भोंडवे यांनी निवडणुकीत उडी घेतली होती. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला. ममता गायकवाड या भाजपच्या तिकीटावर प्रथमच प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख, विशालनगर, धनराज पार्क, वेणूनगर प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती विनायक गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममता गायकवाड या स्थायी समितीच्या 34 व्या अध्यक्षा झाल्या आहेत.