Breaking News

डीएसकेंची बँक खाती गोठवली

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्या 275 बँक खात्यात केवळ 43 कोटी 9 लाख रुपये इतकीच रक्कम असल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेंना अटक केल्यानंतर त्यांची विविध बँकेतील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली. त्यामुळे डीएसके यांनी पैसा कुठे ठेवला, याचा तपास पोलीस घेत आहेत.डी. एस. कुलकर्णी हे गुंतवणुदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. कुलकर्णी यांनी विविध बँकांचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांच्याकडे गहाण असलेल्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डीएसके यांच्याविरोधात 5 हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. 


आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांची मालमत्ता आणि बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यात डीएसकेंची हजारो कोटींची मालमत्ता ’सील’ केली आहे. काही बँकांनी त्यांचे कर्ज थकविल्याने त्यांच्याकडे गहाण टाकलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे कामही सुरू केले आहे. परंतु, डी. एस. कुलकर्णी यांच्या बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.डीएसके ग्रुपकडून 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यांच्या बँक खात्यात केवळ 43 कोटी 9 लाख रुपये इतकीच रक्कम आढळून आली. त्यामुळे डीएसके यांनी बाकीचा पैसा इतरत्र कुठे वळवला आहे का? याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.