Breaking News

तालुका कृषी अधिकारीसह तिघे एसीबीच्या जाळ्यात

अकोला, दि. 19, मार्च - आकोट तालुक्यातील कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामाचे तब्बल 11 लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी खासगी कं त्राटदाराकडून सुमारे एक लाख 60 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या आकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे, कृषी साहायक वनमाला भास्कर व तीचा पती प्रभुदास सुरत्ने या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शनिवारी अटक केली. या तिघांकडून 60 हजार रुपये रोख व एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे.आकोट तालुक्यात खासगी कं त्राटदाराने 2017 मध्ये कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सिमेंट नाला बांध खोलीकरणाची कामे केली. नियमानुसार ई-निवीदा सादर केल्यानंतर त्यांनी कंत्राट मिळविला व त्यानंतर अटींच्या अधीन राहून ही कामे केली. मात्र कामाचे तब्बल 11 लाख रुपयांचे देयक निघत नसल्याने खासगी कंत्राटदार हैरान झाले होते. या संदर्भात कंत्राटदाराने अकोटचा तालुका कृषी अधिकारी मंगेश अरुण ठाकरे याच्याशी संपर्क साधून देयक काढण्यासाठी विनंती केली, मात्र त्याने कृषी साहायक वनमाला उत्तमराव भास्कर उर्फ वनमाला प्रभुदास सुरत्ने (22) रा. भवानीविहार आकोट व तीचा पती प्रभुदास कडूजी सुरत्ने (35) रा. भवानीविहार आकोट यांच्यामार्फत तब्बल एक लाख 60 हजार रुपयांची लाच मागीतली. मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. यावरुन एसीबीच्या अधिकाजयांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तीनही आरोपींनी एक लाख 60 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी एक लाख रुपयांचा धनादेश व 60 हजार रुपये रोख घेउन या तिघांनी कंत्राटदाराला बोलावले. कंत्राटदाराने ही रक्कम व धनादेश कृषी अधिकारी ठाकरे, वनमाला भास्कर व तीचा पती प्रभुदास सुरत्ने या तिघांच्या हातात देताच सापळा रचून असलेल्या एसीबीने या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता या तिघांकडून एक लाख रुपयांची रक्कम लिहीलेला धनादेश व रोख 60 हजार रुपये जप्त करण्यात आले. या तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.