Breaking News

700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सवलत द्या - भाजप

मुंबई, - मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंच्या घरांना मालमत्ता करात सूट व 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना 60 टक्के पर्यंत सवलत देण्याचे शिवसेनेने निवडणुकीपूर्वी वचन दिले होते. तसा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर झाला तरी आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला नाही. याच दरम्यान भाजपने 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव मांडून शिवसेनेचा प्रस्ताव हायजॅक केला. मात्र हा आमचाच प्रस्ताव असून त्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना फायदा होणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दरम्यान आधीच कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत असताना 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत मिळाल्यास पालिकेचा महसूल बुडणार असल्याने पालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मुंबईकरांना 500 चौरस फुटांपर्यंच्या घरांना मालमत्ता करात सूट व 700 फुटापर्यंतच्या घरांना सवलत देण्याचे आश्‍वासन वचननाम्यात दिले होते. त्यानुसार जुलै 2017 रोजी पालिका सभागृहात ठराव मांडून त्याला मंजुरी मिळवली. मात्र हा प्रस्ताव प्रशासनाने अद्याप राज्य सरकारकडे माठी पाठवलेला नाही. ही संधी साधून बुधवारी अर्थसंकल्पीय अ धिवेशनात भाजपने 500 फुटापर्यंतच नाही तर 700 फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी करीत शिवसेनेचा हा प्रस्ताव हायजॅक केला. बुधवारी अधिवेशनात हा भाजपने मांडलेला या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दाखवली आहे. बुधवारी स्थायी समितीत भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी याबाबतची माहिती देत प्रशासनाने अनुकूलता दाखवली असल्याने आता 700 चौरस फुटाच्या मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी तात्काळ पाठवावा अशी मागणी केली. त्यामुळे शिवसेना 500 तर भाजपने त्याही पुढे जाऊन 700 असे श्रेय घेत नेहमीप्रमाणे शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पालिका सभागृहात मंजुरी मिळूनही हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आयुक्तांनी मान्यतेसाठी पाठवला की नाही याचा पाठपुरावा शिवसेनेने का केला नाही, असा प्रश्‍न विचारला जातो आहे. भाजप मात्र शिवसेनेला श्रेयापासून दूर ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालमत्ता करात सूट देणे हा आमचाच मुद्दा आहे, असे म्हणत शिवसेनेने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपने 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्ता करात सूट मिळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारक़डे पाठवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा अप्रत्यक्ष टोला भाजपने शिवसेनेला लगावला आहे. मुंबईतून मध्यमवर्गीयांनी देखभाल खर्च परवडत नाही म्हणून मुंबई सोडू नये हा या प्रस्तावामागचा उद्देश असल्याचे भाजपचे भाजपने म्हटले आहे.