Breaking News

गेल्या 66 वर्षात संसदेत 818 महिला खासदार

 भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या 66 वर्षात 818 महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या 632 तर राज्यसभेच्या 186 महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या 66 वर्षात 21 महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.


सन 1952 पासून आजतागायत देशात 10 हजार 970 खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही 8855 इतकी आहे तर 2115 खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. 

महाराष्ट्रातून 46 महिला खासदार लोकसभेत
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते आजपर्यंत महाराष्ट्रातून 687 खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये 46 महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या 2115 खासदारांपैकी महाराष्ट्रातून 151 खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील 14 महिला खासदारांचा समावेश आहे.


आजपर्यंत 21 महिला खासदार नामनिर्देशित
राष्ट्रपतींनी आजपर्यंत देशातील 133 खासदारांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले ,यामध्ये 21 महिला खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत 7 महिलांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे. 


सोळाव्या लोकसभेत सर्वाधिक 65 महिला खासदार
सध्याच्या 16 व्या लोकसभेत सर्वाधिक 65 महिला खासदारांची नोंद झाली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 6 महिला खासदारांचा समावेश आहे. पंधराव्या लोकसभेतील एकूण 560 खासदारांपैकी 64 महिला खासदार होत्या. पहिल्या लोकसभेत 543 खासदार होते,यामध्ये 24 महिला खासदार होत्या. दुसर्‍या लोकसभेतही 24 महिला खासदारांचा समावेश होता. 


उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 121 महिला खासदार
पहिल्या लोकसभेपासून ते आजपर्यंत उत्तर प्रदेश या राज्याने 1394 खासदार लोकसभेवर निवडून दिले ,यामध्ये 121 महिला खासदारांचा समावेश आहे. पश्‍चिम बंगालने 65, मध्यप्रदेश- 62, बिहार- 59, महाराष्ट्र- 46, आंध्रप्रदेश- 45, राजस्थान- 30, गुजरात -27, पंजाब- 24 ,तामिळनाडू- 23,ओडिशा- 16, कर्नाटक 15, आसाम - 15, तर दिल्लीतून 13 महिला खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. 


नजमा हेपतुल्ला 6 वेळा राज्यसभेवर
राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीमती नजमा हेपतुल्ला या 6 वेळा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत, यापैकी त्या चार वेळा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. याबरोबरच अंबिका सोनी (5 वेळा), जया बच्चन (3 वेळा), रेणुका चौधरी (3 वेळा) झरणा दास, कनिमोझी, निर्मला सीतारामन, वानसुक, विप्लव्वा ठाकूर (2 वेळा) यांचा समावेश आहे.