Breaking News

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने 28 लाखांचा गंडा

सोलापूर, दि. 03, मार्च - वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून संदीप शहा याच्यासह पाच जणांनी मोहोळ येथील सीताराम डोंगरे यांच्याकडून चार टप्प्यांत 28 लाख रुपये उकळून फसवणूक केली. मुलीला 2015 ते 2017 या कालावधीत प्रवेश मिळालाच नाही, संबंधितांनी पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोंगरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सोलापुरातील संशयित आरोपी संदीप शहा यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.त्यांच्या मुलीला एमबीबीएस प्रवेश देण्याचे संदीप जवाहर शहा (रा. फुरडे रे सिडेन्सी, विजापूर रोड) यांनी आमिष दाखवले. शहा आणि अंबिका प्रसाद मिश्रा (रा. पठाणवाडी, मालाड, मुंबई), कल्पना अनिल पगारे (रा. कला नगर, बांद्रा, मुंबई), पांडे (रा. मुंबई), रवींद्र मोरये (रा. मुंबई ) यांनी डोंगरे यांच्याकडून चार टप्प्यांत तब्बल 28 लाख रुपये रोखीने घेतले.

मार्च 2016 मध्ये शहा याने डोंगरे यांना फोनवरून तुमच्या मुलीचा एमएचसीईटीचा ऑनलाइन फॉर्म हा वैयक्तिक कोड वापरून भरला आहे. तुम्ही फॉर्म भरू नका, हॉल तिकीट परीक्षेच्या आधी येऊन घेऊन जा, अशीही थाप मारली. 5 मे 2016 रोजी डोंगरे यांच्या मुलीने परीक्षा दिली व त्याचा निकाल 1 जून 2016 रोजी लागल्याने शहा यांच्याकडे पासवर्ड विचारला. त्यांनी तुमचे काम होईल. एमएचटीसीईटीची गुणपत्रिका तुम्हाला कशाला पाहिजे, तुमचे काम तर व्यवस्थापन कोट्यातून होणार आहे, असे वारंवार सांगून वेळ मारून नेली.7 मे 2017 रोजी मुलीने नीट परीक्षेचा ऑनलाइन फॉर्म भरला, परंतु गुण कमी मिळाल्याने एमबीबीएससाठी प्रवेश मिळू शकला नाही. अखेर बी फार्मसीमध्ये प्रवेश घ्यावा लागला. रकमेबाबत विचारले असता ती रक्कम मॅनेजमेंटचे पगारे, पांडे, मोरये यांच्याकडे आहे, असे शहा सांगत आहे, अशी फिर्याद डोंगरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारी 2018 रोजी दाखल केली. यावरून शहा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार हे तपास करीत आहेत.