Breaking News

फेसबुकद्वारे महिलेला 22 लाखांनी गंडवले

पुणे, दि. 15, मार्च - फेसबुकद्वारे मैत्री करून एका 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा विश्‍वास संपादन करून तिची 22 लाख 52 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बेरी ग्रिफिन नामक इसमावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांच्याशी वारंवार चॅटींग करून त्यांचा विश्‍वास संपादन केला. काही काळानंतर सामाजिक कार्यासाठी मी पुणे शहरात येणार असल्याचे आरोपीने फिर्यादी महिलेला सांगितले. दरम्यान एके दिवशी त्याने फिर्यादी महिलेला फोन करुन भारतात आलो असून माझ्याजवळ परकीय चलन असल्यामुळे मला कस्टम ऑफीसरने पकडले आहे, असे सांगितले. येथून बाहेर पडण्यासाठी मला पैशाची गरज असल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीनेही विश्‍वास ठेवत त्याच्या बँक खात्यात 22 लाख 52 हजार 285 रुपये भरले. त्यानंतर आरोपीचा फोन नंबर बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु पवार अधिक तपास करीत आहेत.