Breaking News

कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामास सुरुवात

सातारा, दि. 15, मार्च - गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले काम गतीने सुरु आहे.

साता-याच्या पश्‍चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरात मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु झाले आहे. सातारा नगरपालिके च्या माध्यमातून सुरु असलेले हे काम मागील टर्ममध्ये मंजूर झाले. गेल्याच महिन्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाचे भू मिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जलसंपदा विभागाकडून करण्यात येत असलेल्या या कामात धरणाचा पाया खोदण्यास सुरुवात झाली आहे.
धरणाला नवी भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणात सध्याच्या तुलनेत चारपट पाणीसाठा होणार आहे. शहरास सध्या तीन योजनांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कास धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रॅव्हिटीने शहरास मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर चोवीस बाय सात योजना साकारण्यास मदत होणार आहे. शहरातील जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून नवीन नळकनेक्शन देण्यात आली आहेत. मीटर बसवण्याचे कामही पूर्णत्वास आले आहे. बारा पाणी टाक्यांची कामे पूर्ण झाली असून त्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जलसंपदा विभागाने गतीने काम केल्यास त्याचा सातारवासियांना तेवढ्या लावकर लाभ मिळणार आहे.