Breaking News

नदी-उपनदीवर 20 ठिकाणी ब्रिज कम बंधारे उभारावेत आ. हर्षवर्धन सपकाळ यांची ना. गडकरींकडे मागणी

बुलडाणा विधानसभा मतदार संघातील भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच नदी पलीकडील गावे व शेती कामात दळण-वळण व वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून प्रथदर्शक व प्रायोगीक प्रकल्प अंतर्गत नद्या व उप नद्यांवर वीस ठिकाणी ब्रिज कम बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्ली येथील भेटीत केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. दरम्यान या बाबत ना. गडकरी यांनी संबंधीत विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधीत विभागाला सुचना दिल्या आहेत.

लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दि. 10 व 11 मार्च 2018 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय जन प्रतिनिधी संमेलन संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या प्रतिनिधी मंडळात आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे. आज दुसर्या दिवशी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या समवेत या संमेलनातील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या लघू विश्रांती दरम्यान आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्याची भैगोलिक परिस्थिती ना.गडकरी यांना विशद केली. अजिंठा पर्वत रांगा व पायथ्याशी असलेल्या या दोन्ही तालुक्यांमधून पैनगंगा, नळगंगा, विश्‍वगंगा व ज्ञानगंगा या नद्यांसह अनेक उपनद्या प्रवाहीत होतात. मात्र भूगर्भीय रचना लक्षात घेता पाणी साठवण क्षमता मर्यादित आहे. तसेच हे दोन्ही तालुके अवर्षणप्रवण म्हणुन ओळखल्या जातात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई व सिंचनाची पर्याप्त सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. त्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात नदी-उपनदी पलीकडे असणा-या शेतामध्ये जाणे-येणे अडचणीचे ठरते.
या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही तालुक्यातील नदी, उपनदी व मोठ्या स्वरूपांच्या नाल्यांवर पथदर्शक प्रकल्प अंतर्गत प्रायोगीक पातळीवर 20 ठिकाणी ब्रिज कम बंधारा उभारल्यास भू-प ृष्ठावरील साठवणूक क्षमता वाढेल तसेच सभोवतालच्या परिसरात भूगर्भीय जल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतक-यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुध्दा शेतामध्ये जाणे-येणे सोईचे होऊन दळण-वळण व वाहतूकीची सुविधा सहजपणे उपलब्ध होणार असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले.
उपरोक्त प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवीत ना. नितीन गडकरी यांनी संबंधीत सचिवांना सविस्तर व परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत विभागाकडून मागवून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण विषय आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐरणीवर आणला असून या प्रस्तावाव्दारे निश्‍चितच नदी लगतच्या गावांमध्ये दळण-वळण वाहतूक सुविधा व शेतीसाठी सिंचन उपलब्ध होणार आहे.