जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत सदस्याचा आत्मदहनाचा प्रयत्न नागरदेवळे ग्रामपंचायतीत 15 लाखाचा अपहार झाल्याची तक्रार
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यांची कामे न करताच पुर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बिले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 15 लाखाच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की काल ( मंगळवार दि. 6 ) रोजी सकाळी महेश झोडगे रॉकेल घेऊन जिल्हा परिषदेत आले. त्यांनी रॉकेल अंगावर ओतुन घेत मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात प्रवेश केला. तेथे झोडगे यांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत झोडगे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 27 फेब्रुवारी रोजी झोडगे यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतीतील घोटाळेबाजांवर कारवाई क रण्याची मागणी केली होती. अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता. या निवेदनात झोडगे यांनी नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये रस्ता कॉके्रटीकरण ( खर्च 10 लाख ), अंतर्गत गटारीचे काम ( खर्च 2 लाख 50 हजार ) या दोन्ही कामांचा पुर्णत्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व विभागिय अभियंता यांच्या स्वाक्षरीने 1 सप्टेंबर 2017 रोजी देण्यात आला होता. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगाच्या निधितुन मथुरानगरी येथे 2 लाख 50 हजार खर्चुन रस्ता पुर्ण केल्याचा दाखला 10 आॉगस्ट 2017 रोजी देण्यात आला आहे. या पुर्णत्वाच्या दाखल्यामुळे संबधित कामांची बिलेही काढण्यात आलेली आहेत. परंतु यातील कोणतेही कामे झालेली नाहीत. त्यामुळे या कामांची बोगस बिले काढून संबधित अधिकारी, ठेकेदार, व त्यांच्या साथिदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केलेला आहे. तेव्हा या प्रकरणाची कसुन चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी झोडगे यांनी केली होती.