Breaking News

देशात पोलीस कर्मचार्‍यांचा तुटवडा; एक लाख लोकांमागे फक्त 151 पोलीस

नवी दिल्ली - भारतात दर एक लाख लोकांमागे 151 पोलीस कर्मचारी आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शिफारसीनुसार हा आकडा प्रति लाख लोकांमागे 222 एवढा असायला हवा, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिली. पोलिसांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी पासपोर्ट पडताळणी, कोर्टाचा समन्स बजावणे, अशा प्रकारची गौण कामे बाह्य स्रोतांद्वारे करून घेण्याविषयीचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही, असे हंसराज अहिर यांनी सांगितले. अहिर म्हणाले, पोलीस खाते राज्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, पोलीस व लोकसंख्या यांचे गुणोत्तर वाढवणे ही कामे राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात. केंद्र सरकार राज्यांना वेळोवेळी सूचना देण्याचे काम करू शकते. पोलिसांच्या संख्येत असलेल्या तुटवड्यामागे निवृत्ती, राजीनामे, मृत्यू अशी कारणे असून नियमित भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ही तूट भरून काढता येऊ शकते, असे अहिर यांनी सांगितले.