Breaking News

कुळधरण - पिंपळवाडी रस्ता बनला जीवघेणा

कर्जत तालुक्यातील कुळधरण - पिंपळवाडी दरम्यान अर्धा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.रस्त्यावर खडी व फुपाट्याचे ढीग साचल्याने दुचाकीचे प्रकार वाढले आहेत. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने रस्त्यावर एक - दीड फुट खोलीचे खड्डे पडल्याने रस्ता जीवघेणा बनला आहे.

कुळधरण ते पिंपळवाडी या सहा किलोमीटर अंतरापैकी उर्वरित साडेपाच किलोमीटर रस्ता डांबरीकरण काम अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर पूर्ण झाले. पिंपळवाडी ग्रामस्थांनी वेळोवेळी संघर्षाची भूमिका घेतली. गावातून राशिनला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे या गावाची राज्यभर चर्चा झाली. एकीचे बळ दाखवत गावकर्‍यांनी अखेर पुढार्‍यांना झुकवले आणि राशिन - पिंपळवाडी रस्त्याचे डांबरीकरण काम पुर्ण करुन घेतले.सध्या दुरगाव, बारडगाव या गावांना जोडण्यासाठी पक्क्या रस्त्यांची गरज आहे.कुळधरणला जोडणार्‍या रस्त्याच्या एका टप्प्याचे काम अपूर्ण राहिल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. कुळधरण भागातून जाणारे नियमित प्रवासी, मंगळवारी जनावरांच्या बाजाराला जाण्यासाठी वाहनांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी अपघातग्रस्त होत असुन चारचाकी वाहने रस्त्यातच अडून राहत आहेत. पालकमंत्री राम शिंदे तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक रस्त्याची कामे मार्गी लागली असली तरी तालुक्यातील कित्येक रस्त्यावरील खडीचे ढीग विकासाच्या वाटेला अडसर ठरत आहेत.


...तर एसटीचा प्रश्‍न मिटेल.
रस्त्याच्या राहिलेल्या कामामुळे पिंपळवाडीला नियमित एसटी बस मिळत नाही. या मार्गावरुन नियमित बस सुरु झाल्यास येथील लोकांचा दळणवळणाचा प्रश्‍न मिटेल.कुळधरण, कर्जतला जाण्यासाठी या रस्त्यामुळे सध्या अडचणी येत आहेत. हा प्रश्‍न मार्गी न लावल्यास गावाला पुन्हा संघटित होवून योग्य निर्णय घ्यावा लागेल.
- रूपचंद पोटरे,
चेअरमन, सेवा सोसायटी, पिंपळवाडी