Breaking News

स्थायी समितीकडून 111 कोटी वाढीव तरतुदीचे अंदाजपत्रक सादर

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी पालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रका पेक्षा 111 कोटी वाढीव तरतुदींचे अंदाजपत्रक सोमवारी महासभेपुढे सादर केले. स्थायी समितीने महापालिकेतील सर्व घटकांचा समतोल व सर्वांगीण विकास व्हावा याचा विचार करून 2018-19 वर्षाकरिता 1809.48 कोटी रुपये जमा आणि 1809.27 कोटी रुपये खर्च आणि शिल्लक रुपये 21 लाख असे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. यापूर्वी दामले यांनी महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्‍वर भोईर आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना तुळशीचे रोप देवून स्वागत केले. सभागृहापुढे अंदाजपत्रक सादर करताना दामले म्हणाले, काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्तांनी महापलिका माध्यमातून पुढील दोन वर्षे नवीन विकास कामे हाती घेता येणार नाहीत अशी आर्थिक स्थिती स्पष्ट करणारा अहवाल सभागृहापुढे मांडला होता. परंतु तो अहवाल सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या त्रुटी दाखवून फेटाळून लावला असला तरी सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना कात्री लावण्यात आली आहे. परंतु असे असले तरी सरकारकडील थकीत अनुदान आणि सामाजिक दायित्व निधी माध्यमातून शहरात महात्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करून विकास कामे पूर्ण करणार.

स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत योजनेद्वारे आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार 1 हजार 650 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. अमृत योजनेतून 180 कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना येत्या दोन वर्षात पूर्णत्वाला जाईल. रस्ते व मलनि:सारण योजना कामे सुरु आहेत. ग्रोथ सेंटर आणि विशेष टाउनशिप गावांमध्ये प्रसझाली तर गावांचा चेहरा-मोहराच बदलेल यासाठी आरक्षित भूखंडाच्या सर्वेक्षणाची गरज आहे. शहरात नाना-नानी पार्क आहेत पण युवकांना विरंगुळ्यासाठी म्हणून युथ पार्कसाठी 50 लाख रुपये तरतूद करण्यात आली असून जागेचा शोध घेऊन काम सुरु करावे. पाणी व हवा प्रदुषण पातळी नेमकी किती याकरिता तरतूद 60 लाख रुपये. याशिवाय गणपती तलाव सुशोभीकरण, वाहनतळ सुविधा, क्लीन-अप मार्शल आणि सुतिकागृहासाठी 5 कोटी. उंबर्डे येथे सायकल ट्रॅक, नेतीवली टेकडीवरील फडके गुहेचे सुशोभिकरण, वॉटर फ्रंट  डेव्हलपमेंट, दुर्गाडी किल्ला परिसर उद्यान आणि विहिरीचे पुनरुज्जीवन, संगणक विभाग, अग्निशमन दल, क्रीडा व सांस्कृतिक, शिक्षण, इस्टेट विभाग, परिवहन विभाग, सुरक्षा विभाग, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य विभाग, नवीन भांडवली कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उंबर्डे व बारावे येथे डम्पिग ग्राउंडला जाण्यासाठी होणार्‍या रस्त्यासाठी 100 लाख रुपये, तसेच प्रत्येकी नगरसेवक स्वेच्छानिधी 15 लाख, स्थायी समिती सुचविलेली कामे प्रत्येकी 100 लाख आणि पदाधिकारी यांनी सुचविलेली कामे प्रत्येकी 25 लाख, प्रभाग अध्यक्ष, शिक्षण आणि महिला बाल कल्याण साठी प्रत्येकी 10 लाख, त्याचप्रमाणे शंभरफुटी मलंग रस्ता, एमआयडीसी रस्ता, नांदिवली पंचानंद ते भोपर रस्ता तयार करण्यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डोंबिवली विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात आली आहे. अशा या 2018-19 वर्षाकरिता 1809.48 कोटी रुपये जमा आणि 1809.27 कोटी रुपये खर्च आणि शिल्लक रुपये 21 लाख असे अंदाजपत्रकास जशीच्या तशी महासभेने अंतिम स्वीकृती द्यावी असे सांगितले.