Breaking News

बाद झालेल्या 10 लाखाच्या नोटा जप्त; चार आरोपींना अटक


अकोला, दि. 03, मार्च - नोव्हेंबर 2016 मध्ये एक हजार व 500 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापार्‍यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तब्बल 10 लाख रुपयांच्या एक हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेउन जात असलेल्या चार युवकांना शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने गुरुवारी महाकाली हॉटेलसमोर अटक केली.
महाकाली हॉटेलसमोर शिवणी येथील रहिवासी सतीष महादेव तायडे हा एका दुचाकीमध्ये चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या 10 लाख रुपयांच्या नोटा घेउन असल्याची माहिती शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला या परिसरात कार्यरत करून पाळत ठेवण्याचे सांगीतले. यावरुन पथकाने या प रिसरात पाळत ठेउन संशयास्पद हालचाल करीत असलेल्या तायडे याला ताब्यात घेतले. त्याची दुचाकी जप्त करून झडती घेतली असता यामध्ये एक हजार रुपयांच्या एक हजार नोटा म्हणजेच तब्बल 10 लाख रुपये जप्त केले. यावेळी सतीष तायडे याचे साथीदार आशीष पांडे, आलोक जोशी, पार्थ लोंडे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या चारही आरोपीं विरुध्द खदान पोलिस ठाण्यात स्पेसीफाइड बँक नोट सेशन ऑफ लायबिलीटी कायद्याच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.