Breaking News

अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यातील खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम - गिरीश बापट


अन्न भेसळ कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सुनावणी घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा त्यासाठी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडेही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत.

यासंदर्भात प्रशासनाच्या व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालयाच्या ( नेमिचंद विरुध्द राजस्थान सरकार) निवाड्यांचे दाखले देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. बापट यांनी दिले आहेत.प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे जेणेकरुन अन्न व्यावसायिकांविरुद्ध प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले खटलेही निकाली लागतील व प्रशासनावरील ताण कमी होईल अन्न व्यावसायिकांनी या विशेष मोहिमेमध्ये न्यायालयात स्वत:हून उत्स्फूर्तपणे हजर होऊन त्यांच्याविरुद्ध दाखल असलेले खटले निर्णयी लावण्यास व स्वत:वरचाही ताण कमी करण्यास मदत करावी तथा त्यांच्यावर जनस्वास्थ्य रक्षणाची असलेली जबाबदारी, सुरक्षित व दर्जेदार अन्न पदार्थ पुरवून पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.