Breaking News

सिद्धटेकच्या बोटींग व्यवसायाला घरघर,पावसाळ्यात पाण्याला दुर्गंधी ; उन्हाळ्यात भीमा पात्र कोरडे : व्यावसायिक कर्जबाजारी


अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे हजारो भाविक सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतात. भीमानदी किनारी वसलेल्या या पर्यटनस्थळी अनेकांना बोटींगचा आनंद घेण्याची इच्छा असते. परंतू पावसाळा तसेच हिवाळ्यात उपलब्ध असलेले पाणी प्रदूषित दुर्गंधीयुक्त तर उन्हाळ्यात पात्र कोरडे असल्याने भाविकांना बोटिंगच्या आनंदाला मुकावे लागत आहे.
भीमा नदीच्या तिरी वसल्याने येथील तीर्थक्षेत्राला धार्मिकतेबरोबरच जलपर्यटचे वेगळेपण आहे. बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी भाविकांचा कल असतो. त्याचबरोबर भीमा नदी पात्रात पुणे जिल्ह्यातील कारखान्यांतून रसायनयुक्त घटक पाण्यात सोडले जातात. त्यामुळे पाणी दुर्गंधीयुक्त व काळपट बनत असल्याने या पाण्यात बोटिंगचा आनंद घेता येत नाही. बोटिंग न करता आल्याने पर्यटक निराश होत आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेले सिद्धटेक हे स्थळ राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.शहरीकरणाचा स्पर्शही न झालेले हे देवस्थान निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. भौगोलिक स्थितीचा विचार करून येथे अनेकांनी बोटिंग व्यवसाय सुरु केला. मात्र ज्यावेळी उन्हाळ्यात बोटींगचा आनंद घेण्यासाठी भाविक येतात, त्याकाळात पात्रात पाण्याची कमतरता असते. उन्हाळ्यात भीमेच्या पात्रात निव्वळ डबकी शिल्लक राहत असल्याने बोटिंग बंद राहते. बोटींग बंद झाल्याने पर्यटक नदीपात्राकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे सिध्दटेकची जलपर्यटनाची ओळख कमी होत चालली आहे.

वाळू उपसा करणार्‍या बोटींचा अधीक जोर...
सिध्दटेक येथे पुलानजिक पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था केलेली आहे. मात्र या परिसरात वाळू उपशाच्या बोटींचाच राजरोसपणे वावर सुरु आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाळू तस्करांवर कारवाई आदी कारणांमुळे शासनाची एक बोट तेथे उपलब्ध आहे. मात्र महसुल विभागाकडुन त्याचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. जयसिंग भैसडे हे कर्जतचे तहसीलदार त्यांनी अनेकदा या बोटीचा वापर करीत नदीपात्रात तस्करांचा पाठलाग करुन कारवाई केली होती. परंतू आजमितीस खुलेआम अनधिकृत वाळू उपसा होत असुन कारवाई होत नाही. बोटीचा खासगी लोकांकडून धंद्यासाठी वापर होत असताना त्यावरही कारवाई होत नाही.

बोटिंग व्यवसायाचे थकित कर्ज...
सध्या बोटिंग टेंडर मुदत संपलेली आहे. पुन्हा टेंडर निघाले नाही. यापुर्वी बोटींग सुरु करण्यासाठी शासनाचा कर भरला. सर्व अटी, शर्ती पूर्ण केल्या मात्र येथील पाण्याच्या या स्थितीमुळे व्यवसाय चालला नाही. गुंतवणूक वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. बँकेचे कर्ज हप्ते न गेल्याने बोटींग संस्था आजही थकितमध्ये आहे.

संतोष रणदिवे,
बोटिंग व्यावसायिक,
सिध्दटेक.