Breaking News

‘जिजामाता’चे नाव उज्ज्वल करा: हभप भास्करगिरी महाराज


भेंडा प्रतिनिधी ;- स्व. मारुतराव घुले पाटलांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संकुलाचे हे रोपटे लावले. हे बघण्यासाठी साहेब असायला हवे होते. आज या संस्थेतून हजारो मुले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दहावीच्या मुलांनी चांगले यश मिळवून जगाच्या पाठीवर जिजामाता पब्लिक स्कुलचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. 

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता पब्लिक स्कूलच्या दहावीतील विद्यार्थांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. पांडूरंग अभंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, जि. प. सदस्य दत्तू काळे, कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे, अशोक मिसाळ, कारखान्याचे संचालक रावसाहेब निकम, संजय मिसाळ आदी उपस्थित होते. प्राचार्य दिनकर टेकने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य दीपक राऊत यांच्यासह शिक्षकांनी यांनी परिश्रम घेतले. सारिका यांनी आभार मानले.