Breaking News

मोखाड्यातील पाच शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

पालघर, दि. 20, फेब्रुवारी - पालघर जिल्हातील मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चंद्रकांत नांदे (मोखाडा), किशोर पवार (हिरवे पिंपळपाडा), संतोष पाटील (उधळे), मोतीराम झुगरे (डोल्हारा), गुरुनाथ खोरगडे (वाशाळा) या पाच शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर केंद्रनिहाय एक शिक्षकांची प्रयोगशिल व उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करण्यात येऊन त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मोखाड्यातील साई मंदिराच्या विठ्ठलदादा पाटील सभागृहात हा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ होते. यावेळी वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, पुरस्कारार्थीची निवड करताना पुढील वर्षापासून फायली मागवायच्या नाही तर आपण स्वतःहून शाळांना भेटी देऊन, उत्कृष्ट शिक्षक निवडून त्याची आदर्श शिक्षक म्हणून निवड करायची जेणेकरून या निवडीत पारदर्शकता येईल असे सांगितले आहे. तसेच पुढील वर्षापासून 5 सप्टेंबरला शिक्षक दिनालाच या पुरस्कारांचा कार्यक्रम होईल अशी ग्वाही सभापती प्रदीप वाघ यांनी दिली आहे.