Breaking News

खा. पूनम महाजन यांची सातारा जिल्ह्यात युवा संवाद यात्रा

सातारा, दि. 20, फेब्रुवारी - भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात 23 व 24 फेब्रुवारी रोजी युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी दिली. साता-यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खा.पुनम महाजन या प.महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून या दरम्यान 23 व 24 रोजी सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी वरकुटे, ता.माण येथे शाखेचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर शिरताव, विरकरवाडी येथे स्वागत स्विकारून व म्हसवड येथे सिध्दनाथाचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर म्हसवड बाजार पटांगण येथे आयोजित युवा समन्वय परिषदेमध्ये युवकांना मागदर्शन क रण्यात येणार आहे. पुढे गोंदवले येथे ब्रम्हचैतन्य महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून खटाव येथे शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी कोरेगाव -खटाव विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते होणार आहे. पुढे पुसेगाव, कोरेगाव व रहिमतपुर येथे स्वागत स्विकारून फत्यापुर, ता.सातारा या ठीकाणी शहीद जवानांच्या कुटुंबियासमवेत त्या संवाद साधणार आहेत. 24 रोजी साता-यातून निघून पुढे नायगाव ता.खंडाळा येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करणार असून त्यावेळी शिल्प सृष्टी येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील युवती व महिलांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती अमोल जाधव यांनी यावेळी दिली.