नाशिक ;- राज्यातील दोन लाखपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचार्यांना पोलिस कामाच्या ठिकाणी चांगली निवासाची सुविधा देण्यास शासन कटीबद्ध असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. वासननगर पोलीस वसाहतीमधील विविध कामांचा शुभारंभ त्यांचे हस्ते झाला याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पाटील म्हणाले, पोलीस वसाहतीच्या सुधारणांसाठी शासनाचे धोरण क्रांतीकारक आहे. सर्व सोईंनीयुक्त घर देण्याच्यादृष्टीने शासनाने निर्णय घेतले आहेत. या विभागाच्या जागांच्या विकसनासाठी अडीच एफ.एस.आय. देऊन कामाच्या ठिकाणी हक्क ाचा निवारा देण्यासाठी उपाय केले जात आहेत. यामुळे पोलिस कर्मचार्यांच्या कुटुबियांना व गृहिणींना समाधान मिळेल अशा सोईसुविधा निर्माण करण्यात येतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.