Breaking News

‘मोस्ट वाँटेड’ अबू बिलालच्या शोधासाठी जिल्हयात नाकाबंदी

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - जम्मू-काश्मिर येथून पळालेला दहशतवादी अबू बिलाल (33) बेळगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातही पोलीस यंत्रणेला हायअलर्ट करण्यात आले आहे. रविवारी दुपारपासून पोलिसांनी सर्वत्र नाका बंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू ठेवली होती. या दहशतवाद्याला पकडण्यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दहा लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे, अशी माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली.


केंद्र सरकारला हवा असलेला दहशतवादी अबू बिलाल बेळगाव-रामदुर्गा येथून शनिवारी रात्री 12 वाजता एमएच-9 एवढाच क्रमांक असलेल्या आयटेन चारचाकीमधून मुंबईच्या दिशेने चालल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली होती. त्या चारचाकीमध्ये स्वतः अबू बिलाल ब्राऊन कलरचा लायनिंगचा शर्ट घालून आहे. तर चालक निळया रंगाचा प्लेन शर्ट घालून आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कारमध्ये हत्यारे व शस्त्रास्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. आयटेन कारमधून चाललेल्या या दहशतवाद्याचे बेळगाव-हातकलगी नाक्यापर्यंत लोकेशन मिळाले होते. मात्र, त्यापुढे त्याचे काहीच लोकेशन मिळू शकलेले नाही. त्यामुळे कर्नाटक पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांनाही अलर्ट करण्यात आले होते.