Breaking News

बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला ;निंभेरे येथील घटना


आश्वी : प्रतिनिधी ;- राहुरी तालुक्यातील संगिता बाळासाहेब सिनारे (वय- ४५) या महिलेवर शनिवारी {दि.१०} पहाटे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ राहुरी आणि नतंर नगरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. 

गुहा-शिबलापूर रस्त्यावरील कापूरीआई फाट्यालगत सिनारे वस्ती आहे. या वस्तीवरील बाळासाहेब बाबुराव सिनारे हे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. शनिवारी (दि. १०) पहाटे त्यांची पत्नी संगीता सिनारे या नित्याच्या कामासाठी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डाळिंबाच्या बागेकडे गेल्या. त्यावेळी भुकेने व्याकूळ झालेला आणि भक्ष्याच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने त्या जमीनीवर कोसळल्या. प्रतिकार करत त्यांनी मोठ्याने आरडा-ओरड करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संगीता सिनारे यांचे पती बाळासाहेब सिनारे आणि आजूबाजूचे विकास सिनारे, अर्जुन सिनारे, सुनिल सिनारे, राजेंद्र सिनारे, अनिल मांढरे, मिरा मांढरे, हिरा मांढरे, पुजा मांढरे, शोभा सिनारे, मंदा पाटोळे, जना सिनारे, लक्ष्मण नागरे आदींनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. या सर्वांनी संगीता सिनारे यांच्यावर हल्ला करत असलेल्या बिबट्याला हुसकावून लावले. जखमी संगीता सिनारे यांना तात्काळ उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कंबरेवर व हातावर मोठ्या जखमा असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नगरच्या ग्रामीण रुग्णालयात हालवण्यात आले. दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळाल्यानतंर राहुरीच्या वनकर्मचार्यानी घटनास्थळी येऊन पाहणी केली.