नगराध्यक्षा आदिक यांच्या कामाची झलक दिसू लागली ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रम उत्साहात
नगराध्यक्षा आदिक यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातील कामांना गती आल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. शहरात सर्वात मुख्य समस्या असलेल्या रस्त्यांची कामे करण्याचा धडाकाच नागराध्यक्षांनी लावला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक होण्यास सुरुवात झाली आहे. भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले होते. शहरातील सारे रस्ते ठिकठिकाणी उखडले होते. मागील काही वर्षांपासून शहरातील जनता रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हैराण झाली होती. नगराध्यक्षा आदिक यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या कामांना प्राधान्य देत नागरिकांची प्रमुख समस्या सोडवत नागरिकांच्या मनात घर करण्याचे काम केले.
शहरातील धान्य मार्केट ते स्टेट बँक चौक, दमाणी हॉस्पिटल परिसर, बालिका शाळा परिसर, जिजामाता चौक ते बाजारतळापर्यंत, नगरपाकिकेच्या जुन्या उद्यानालगतचा रस्ता, पूर्णवादनगरमधील रस्ते, महानुभावआश्रमासमोरील रस्ता अशा अनेक महत्वपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. नुकतेच सुरु केलेले भळगट हॉस्पिटल ते थत्ते मैदान रस्त्याचे कामही जोरात सुरु असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. गोंधवनी रस्त्यावरील खड्डे शहरात मोठा चर्चेचा विषय बनला होता. नुकतेच गोंधवनी रस्त्यावरील सर्व खड्डे डांबर व खडीने पॅचिंग केले आहेत. तसेच संगमनेर रस्ता, मुख्य रस्ता, नेवासा रस्ता आदी ठिकाणचे छोटे मोठे खड्डे खडी व डांबराने पॅचिंग केल्याने शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील रस्त्यांबरोबरच आगामी काळात नगरपालिकेच्या शाळा टप्प्याटप्प्याने संगणकीकृत करण्याचाही त्यांचा प्रयत्न राहणार आहे. तसेच शहरात चारही बाजूला चार भाजीमंडई लवकर करण्यास त्या प्राधान्य देणार आहे.
