Breaking News

स्व. काळेंच्या प्रयत्नांतून वृक्षराजी बनलेय पक्षांचे आश्रयस्थान


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- गौतमी गोदावरी नदीचे स्वच्छ पाणी, नदीचा विस्तीर्ण किनारा आणि गोदावरी उजवा कालव्याचा खळखळ प्रवाह हा संगम तालुक्याला लाभला आहे. या तालुक्याच्या पश्चिम भागात सुरेगाव येथील साखर कारखाना उभारणीतून हजारो हात्यांना रोजगार मिळाला. भूतदयेसह निसर्गाचा समतोल साधण्यासाठी स्व. शंकरराव काळे यांनी या परिसरात लावलेल्या अनेक प्रकारच्या वृक्षराजीचा विविध प्रकारच्या हजारो पक्षांसाठी मोठा आधार मिळत आहे. 
या परिसरात आंबा, नारळ, लिंब, वड, पिंपळ, जांभूळ, रेन ट्री, बूच आदी शेकडो वृक्षांच्या या वनराईत हजारो पक्षी सुरक्षित निवास करत आहेत. सकाळी सकाळी चिल्यापिल्यांना चारा, पाणी शोधायला निघण्यापूर्वी अर्थात सकाळच्या वेळी आणि सांयकाळी घरट्याकडे परतत असताना हजारो पक्षांचा येथील वृक्षांवर बसतांना या पक्षांचा चिवचिवाट अनेकांचे लक्ष वेधून घेतो. या पक्षांमध्ये कंठवाला पोपट, सांळुकी, करकोचा,गाय बगळा, राखी बगळा, कावळा, पारवा, चिमणी, टिटवी, कोतवाल यासह कवड्या परीट शेकाट्या, भारद्वाज कोतवाल, पळस, मैना, कोकिळ आदी पक्षांचा समावेश आहे. कारखाना परिसरात साखरेचे गोडावून तर पारवा व कंठवाला पोपटाचे राहण्यासाठी सुरक्षित आणि हक्काचे ठिकाण आहे. वड आणि पिंपळ या झाडांवर बगळे, तर रेन ट्री व बुचाच्या वृक्षावर करकोचा, पळस, मैनेचा निवारा आहे. येथील पत्र्याच्या शेडवर या सर्व पक्षांनी आपापली निवासस्थाने आरक्षित केली आहेत. गोदावरी नदी, गोदावरी उजवा कालवा आणि ओढे नाले यातून मासे, किटक तर फळबागांतून मिळणारी फळे, फुलांमुळे हा परिसर पक्षांच्या दुष्टीने प्रजननासाठी सुरक्षित मानला गेला आहे. त्यामुळे या भागांत पक्षांच्या संख्येत वाढच होत आहे.

माजी आ. अशोक काळे, कर्मविर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आसवनी विभागाचे जनरल मँनेजर जयवंत भिडे, कार्यकारी संचालक गिरीष जगताप यांच्या सतर्कतेमुळे दरवर्षी वृक्ष लागवडीने कारखाना परिसर हिरवा शालू परिधान करतो आहे. कोपरगाव तालुक्यात पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात ग्रामीण भागात निसर्गाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे.