Breaking News

महापुरुषांच्या नावाने चाललेली दुकानदारी बंद करा : नगराध्यक्ष वहाडणे


कोपरगाव / शहर प्रतिनिधी :- राष्ट्रहितासाठी वेगवेगळ्या विचारसरणीच्या विचारवंतानी एकत्र येऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे. अन्यथा काही वर्षातच भारताचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. यासाठी महापुरुषांच्या नावावर चालत असलेली दुकानदारी बंद कार्य यायला हवी, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. 
शब्दगंध साहित्य संमेलनातील ‘जाती धर्माच्या अस्मितेचे राजकारण प्रगतीला मारक आहे’ या परिसंवादात ते बोलत होते. ते म्हणाले, की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा मी सच्चा पूजक आहे. संसदेत वंदेमातरमला विरोध करणा-याबद्द्ल एकही शब्द न बोलणारे ‘जय श्रीराम’ला मात्र आक्षेप घेतात. आर. एस. एस.चे पूर्णवेळ प्रचारक ब्रम्हचारी राहून कार्य करतात. समाजवादी विचारसरणीतही स्व. एस. एस जोशींसारखे आदर्श नेते आहेत. आम्ही त्यांचाही सन्मान करतो. नागपूर येथे असलेली महामानवाची दीक्षा भूमी व डॉ. हेडगेवार, प. पू. गोळवलकर गुरुजी यांचे समाधिस्थान असलेले संघाचे मुख्यालय आम्ही पवित्र मानतो. सर्वसामान्य माणूस काहीच बोलत नाही. फक्त स्वत:ला विचारवंत समजणारे व पोट भरलेलेच वादविवाद करताहेत, हे घातक आहे. विविध विचारसरणीच्या मंडळींनी एकत्र येऊन चर्चा केली तर राष्ट्राची प्रगती वेगाने होऊ शकते.