Breaking News

स्वयंघोषित पक्षप्रतोद फंड यांचे आरोप हास्यास्पद महाआघाडीच्या नगरसेवकांची टीका


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी / शहर स्वच्छतेबाबत खोटा पुळका दाखवणाऱ्या स्वयंघोषित पक्षप्रतोद यांनी स्वच्छतेबाबत नगराध्यक्षा अनुराधा कदम यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत, अशी टीका महाआघाडीचे नगरसेवक राजेंद्र पवार, दीपक चव्हाण, केतन खोरे, अल्तमश पटेल, आबासाहेब गवारे, रईस जहागीरदार यांनी केली आहे. 
नगराध्यक्षा अनुराधा यांनी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आडकाठी आणल्याचा आरोप फंड यांनी केला होता. त्यास महाआघाडीच्या नगरसेवकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ज्या दिवशी नगराध्यक्षांनी नगरपरिषदेचा कारभार हाती घेतला, त्या दिवसापासूनच त्यांनी शहराच्या स्वच्छतेबाबत स्वतः पुढाकार घेतला. शहरातील प्रत्येक भागात हातात झाडू घेऊन साफ सफाई केली. त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या स्वच्छतेबाबतची स्पर्धा शासनाकडून आयोजित केलेली नव्हती. ‘माझे शहर स्वच्छ असावे’ हा प्रामाणिकपणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षांनी शहरातील विविध संस्था, संघटना, नगरपरिषद कर्मचारी आदींनाबरोबर घेऊन स्वतः स्वच्छता मोहिम हाती घेतली आणि ती सुरु ठेवली. नगराध्यक्षांवर आरोप करणाऱ्या या स्वयंघोषित पक्षप्रतोदाच्या प्रभागात जेव्हा स्वच्छता मोहीम सुरु होती, तेव्हा पक्षप्रतोद कोठेही दिसले नाही. त्यांनी स्वतः नगराध्यक्षपदाच्या काळात स्वतः झाडू घेऊन कोठेही सफाई केल्याचे ऐकिवात नाही.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी माजी सत्ताधारी पक्षप्रतोदांचे काळे धंदे बंद केले. त्यामुळे नगराध्यक्षांवर असे बेताल वक्तव्य सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून पालिका प्रशासनात आमुलाग्र बदल करुन नगराध्यक्षा आदिक यांनी आपल्या कामाची चुणुक दाखवलेली आहे. गेल्या पंचवीस वर्षांत अन्याय झालेल्या अनेकांना न्याय देण्याचे काम त्यांनी वर्षभरात केले. मेनरोडवर असलेल्या गरीब रसवंती चालकाचे रसवंती गृह सुरु होऊ नये, म्हणुन ४ दिवसांपूर्वी भरचौकात दमदाटी करणारा स्वयंशीतघोषित पक्षप्रतोद आता जनतेविषय कळवळा दाखवतो. यातून यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, हे स्पष्ट होते. 

माजी सत्ताधार्‍यांनी जनतेबरोबरच पालिका कर्मचार्‍यांवर अन्याय केल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखादी महिला सफाई कर्मचारी तत्कालीन नगराध्यक्षांपेक्षा चांगली साडी घालून आली तरी दम देऊन कामावरुन घरी पाठविले जायचे. यामुळे यांना जनतेने मतपेटीतून कायमचा घराचा रस्ता दाखविला. शहरातील सर्व रस्तेच तत्कालीन सत्याधार्‍यांनी फोडून ठेवले. आम्ही ते पूर्ववत करण्याचे काम सुरु केले. पालिका म्हणजे स्वतःचे घर भरायची संस्था समजून दमदाटी करुन जमिनी लुटण्याचा यांचा काळा धंदा जनतेपासून लपून राहिलेला नाही. खोटे पण रेटून बोलणारे स्वयंघोषित पुरेसे संख्याबळ नसतांनादेखील काँग्रेस पक्षप्रतोदाचा तोरा मिरवत आहेत, अशी जहरी टीका पवार, चव्हाण, पटेल, गवारे, खोरे, जहागीरदार यांनी केली आहे.