शेतकर्‍याला दमबाजी करत कांद्याचा ट्रक घेवून पसार


कांदा माझा आहे मी सांगल त्या ठिकाणी ट्रक घेऊन चल. अशी ट्रक चालकाला तसेच शेतकर्‍याला दमबाजी करत 450 गोण्या, अंदाजे 4 लाख रुपये किमतीचा कांदा असलेला ट्रक घेवून पसार झाल्याची फिर्याद मल्हारवाडी येथील शेतकरी अर्जुन काशिनाथ जाधव यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत हकीगत अशी की, मल्हारवाडी ता. राहुरी येथील रहीवाशी शेतकरी अर्जुन काशिनाथ जाधव (वय-63 वर्ष) यांची कणगर बु. शिवारात गट नंबर 526/2 येथे शेती असून त्यांनी या जमिनीत कांद्याचे पिक घेतले होते. दि. 19 फेब्रुवारी रोजी सदर कांदा काढणीनंतर तो विक्रीसाठी वांबोरी येथे घेऊन जाण्यासाठी त्यांनी ट्रक क्रमाक एमएच 16 वाय 9833 हा भाडे तत्वावर घेवून, कांद्याच्या अंदाजे 50 ते 55 किलोच्या 450 गोण्या या क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून मल्हारवाडी - ताहाराबाद - राहुरी मार्गे राहुरी कोर्टाच्या शेजारून चालले असता, त्यावेळी शामराव भागवत गाडे रा. घोरपडवाडी ता. राहुरी व इतर तीन अनोळखी व्यक्ती यांनी ट्रक ला अडवे होऊन, ट्रक आडवत शेतकरी जाधव यांना खाली उतरवून ट्रक ड्रायवारला दमबाजी करत ट्रक 450 गोण्या अंदाजे 4 लाख रुपये किमतीचा कांदा असलेला ट्रक पळवून नेल्याची फिर्याद अर्जून जाधव यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिली आहे. राहुरी पोलिसांत गुन्हा रजिस्टर नं. ख 94 / 18 भा.द.वि. 341, 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीष शिरसाठ करत आहेत.