फसव्या कर्जमाफीप्रकरणी मुख्यमंत्र्यांना घेरणार : अॅड. पालवे
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर यासंदर्भातील अनेक निकष बदलले. कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांवर बँकांनी कोर्टात वसुलीचे दावे दाखल केले आहेत. त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा नवा फतवा राज्य सरकारने काढला आहे. हा फतवा कर्जमाफीस खऱ्या अर्थाने पात्र ठरत असलेल्या शेतकऱ्यांच्या नरडीला नख देणारा आहे. शेतकऱ्यांवरचा हा अन्याय कदापि सहन घेतला जाणार नाही. कर्जमाफीस पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना आजतागायत कसलाही संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला नाही. अशा शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, आधुनिक सुलतानशाहीचा फतवा जाहीर झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. छोटी मोठी निदर्शने करण्याऐवजी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनाच घेराव घालून हा प्रश्न धसास लावण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे. येत्या आठ दिवसांत क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
