Breaking News

कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. कोल्हे बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा उत्साहात

कोेपरगांव प्रतिनिधी ;- प्रत्येक क्षेत्रात कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ते संघटित नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळण्यात अडचणी निर्माण होतात. कोपरगांव तालूका इमारत बांधकाम कामगार संघटनेने याबाबतची नोंदणी करून या कामगारांना संघटित केले, ही बाब समाधानाची आहे. या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू. त्यासाठी मंत्रालयात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही, आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिली. 

तालुक्यातील इमारत बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आ. स्नेहलता कोल्हे यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्या बोलत होत्या. शासकीय अधिकारी माटे यांच्या हस्ते सभासदांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कोपरगांव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कामगारांच्या अडचणींबद्दल माहिती दिली. बांधकाम व्यावसायिक सोमेश कायस्थ प्रास्तविक यांनी केले. ते म्हणाले, की युती शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असंख्य योजना आहेत. त्या योजनांचा पाठपुरावा आ. कोल्हे यांच्यामार्फत करून कामगारांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. उपाध्यक्ष सादिक पठाण व सचिव सुधाकर क्षीरसागर यांनी कामगार नोंदणीचे महत्व समजावून सांगितले. शासकीय अधिकारी माटे यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.