एनएमएमटी बसचालकाला रिक्षाचालकाची मारहाण, आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असताना ठाणे स्थानका नजीक सिडको बस स्टॉप येथे राबोडीत बेकरी जवळ राहणाऱ्या रिक्षाचालकाने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसचालकाला चक्क पटट्याने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.याप्रकरणी मुजोर रिक्षाचालक मोह.शहाआलम यासीम (22) याला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली केली असून न्यायालयाने गुरुवारी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एनएमएमटी बसचालक बाळाजी भानुदास वाघे (30) रा. दिघा हे बुधवारी रात्री बस घेऊन ठाण्यातील सिडको येथील बस थांब्यावर आले.तेव्हा,त्याच परिसरात दुस-या एनएमएमटीच्या बस चालकासोबत रिक्षाचालक मोहम्मद यासीम हा वाहन उभे करण्यावरून वाद घालत होता.तो वाद पाहून बसचालक वाघे हे वाद सोडविण्यासाठी गेले होते.याचदरम्यान यासीमने त्या चालकाला सोडून वाघे यांच्याशी वाद घालून पट्ट्याने मारहाण केली.या मारहाणीत वाघे यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली.
