Breaking News

सराईत गंठणचोर जेरबंद २ लाखांचे दागिणे जप्त


शहर परिसरात वारंवार होत असलेल्या गंठनचोरीत सक्रिय असलेल्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत खंग्या उर्फ विनोद विजय चव्हाण {वय २२} तसेच चिंक्या उर्फ अनुप गोडाजी चव्हाण {वय ३३, दोघेही रा. अशोकनगर ता. श्रीरामपूर} या दोघांना अटक करण्यात आली. 
दरम्यान, या आरोपींपैकी पहिल्या आरोपीने शहरात केलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली. यातील फिर्यादी श्रीकांत शिवाजी सातपुते {गुन्हा रजि. २६९/१७} यांच्या आई शांताबाई शिवाजी सातपुते यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे गंठण चोरले होते. या आरोपींनी श्रीरामपूर येथील सोनाराकडून केलेली लगड हस्तगत करण्यात आली. दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी दीपाली गजानन खाडे {रा. गोल्डन सिटी, संगमनेर} {गुन्हा रजि क्र. ११४/१७} यांच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार ५०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरले. श्रीरामपूरच्या सोनाराकडून जप्त करण्यात आले. त्याचबरोबर पुष्पा मधुकर खत्री {रा. गायत्री सॊसायटी संगमनेर} {गुन्हा रजि क्र. १२६/१७} यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे गंठण सबलापूर येथील सोनाराकडून हस्तगत करण्यात आले आहे. चोरट्यांनी याकामी वापरलेली बजाज कंपनीची दुचाकी {क्र. एम. एच. १७ बी. पी. १९९८} हीदेखील पोलिसांनी हस्तगत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात व पो. नि. गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. पी. पी. निकम, पो. कॉ. इस्माईल शेख, पो. ना. अहिरे, पो. ना. विजय पवार, पो. कॉ. बोडखे, पो. कॉ. सागर धुमाळ यांनी या कारवाईत भाग घेतला.