Breaking News

तालुक्यात बांधकामाचा सिध्दटेक फॉर्म्युला अनेक बांधकामे जमीनदोस्त; सुशोभीकरण गार्डन जळून खाक


कर्जत तालुक्यात बांधकामाचा सिध्दटेक फॉर्म्युला उदयाला येत आहे. बांधकाम पूर्ण होताच काही कालावधीतच बांधकाम जमीनदोस्त होण्याची हमी देणारा हा पॅटर्न तालुक्याची मान खाली घालायला लावणारा आहे. नागरिकांत लोकजागृती झाल्याशिवाय हा फॉर्मुला मोडीत निघणार नसल्याचे दिसते.अष्टविनायकापैकी एक देवस्थान असल्याने येथील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध होतो. मात्र येथील कामे अत्यंत निकृष्ट होत असल्याने त्याचा जनतेसाठी तसेच भाविकांसाठी कसलाच उपयोग होत नाही. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जलकुंभ, प्रसादालय, भक्तनिवास तसेच सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सिध्दटेकच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला. मात्र येथील कित्येक कामे नियोजनाच्या अभावामुळे पूर्णत्वास गेली नाहीत.जी कामे झाली त्याची सध्याची स्थिती दयनीय आहे.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून झालेल्या कामाची माहिती प्रसारासाठी तीन कोणशिला बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याचे बांधकाम लगेचच भूईसपाट झाले. कोणशिलेजवळच्या फरशा गळून पडल्या आहेत. समोरील सुशोभिकरणासाठीची हिरवळ आणि वृक्ष जळून खाक झाले आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र अवकळा आल्याने कित्येक भाविकांनी परिसरात फेरफटका मारणेही बंद केले आहे.