Breaking News

मा. न्यायमुर्ती कोळसेंना पोलिस संरक्षण द्या ः ग्रामीण पत्रकार संघ

माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे यांना पोलिस सुरक्षा मिळणेबाबतचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना अहमदनगर जिल्हा यांचे वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगीरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पोलिस प्रमुखांना देण्यात आले आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांनी न्यायमुर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी होणेकामी देशभर जाहीर कार्यक्रमात भाष्य केल्याप्रकरणी न्यायमुर्ती कोळसे पाटलांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या न्यायमूर्ती कोळसे पाटलांच्या गाडीच्या काचा अज्ञातांनी फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, याबाबत माजी न्यायमूर्ती कोळसे यांच्या जीवीतास धोका असून कोळसे पाटलांनी धर्मांध प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवल्याने काही लोक देत असलेल्या निनावी धमक्यांची शासनाने योग्य दखल घेवून न्यायमूर्ती कोळसे पाटलांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे व धमक्या देणार्‍या प्रवृत्तींचा शोध घेवून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन अप्पर पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांनी स्विकारले तर या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगीरे, जिल्हासचिव अनिल कोळसे, जिल्हाकार्याध्यक्ष संतोष जाधव, राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे, उपाध्यक्ष सतिष फुलसौंदर, राहुरी शहराध्यक्ष शरद पाचारणे, पत्रकार समीर दाणी, रोहीत वाळके, गोरक्षनाथ बांदल, आबीद दुलेखान आदी उपस्थित होते.