Breaking News

सरकारचा केवळ सामान्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न - सुनील तटकरे


धुळे, दि. 20, फेब्रुवारी - मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया आणि आता कोट्यवधींच्या जाहिराती करून सुरू केलेला उपक्रम आणि मॅग्नेटीक महाराष्ट्र यासारखे गोडगोड नावे देऊन सामान्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धुळ्यात केला. ते आज, सकाळी धुळ्यात हल्लाबोल यात्रेत आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. सरकारला जागे क रण्याची वेळ आली असून, धर्मा पाटील यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चानिमित्त सोमवारी (दि.19) रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा़. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आले होते़ याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे बोलत होते. कोट्यवधी रुपये जाहितांवर खर्च करून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला़ यापूर्वी मेक इन महाराष्ट, स्टार्टअप इंडिया राबविण्यात आले़ देशभरातील गुणवणूकदारांना महाराष्ट्रात आणून आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ मात्र प्रत्यक्षात ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले त्यातून उत्पादन सुरू झाले काय? किती रोजगार निर्मिती झाली? याचे आकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावेत़ वास्तवात महाराष्ट्र गुंतवणूकच झाली नसून रोजगार देखील घटला असल्याचे ते म्हणाले. ज्या महाराष्ट्रात देशभरातून कामगार रोजगारासाठी येत होते़ त्यांच्यावर आता बाहेर जाण्याची वेळ या सरकारमुळे आली आहे़ इतर राज्यात शेतकर्‍यांना चोविस तास मोफत वीज दिली जाते़ मात्र महाराष्ट्रात मोफत सोडाच पण आठ तास देखील वीज मिळत नाही़ सध्या तरी वीज बिल भरू न शकणार्‍या शेतकर्‍यांची वीज जोडणी खंडीत करण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी झालेलीच नाही. एकीकडे बोंडअळी, गारपीटने कापसाचे नुकसान झाले. तर शेतकर्‍यांना भरपाई मिळाली नसून त्यांची फसवणूक या सरकारने केली आहे. परिणामी मंत्रालयात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. धुळ्याचे धर्मा पाटील यांना अद्यापही न्याय मिळाली नसल्याने त्यांच्या अस्थिचे विसर्जन झाले नाही़ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठीच हल्लाबोल सुरू केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले़
सर्वाधिक संख्याबळाचे सरकार असूनही भाजप-शिवसेना युतीच्या सरकारचा वकुब संपला असून, शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची निंदानालस्ती करण्यात येते,असा टोलाही त्यांनी लगावला. 
सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या धमकीचे शतक आता पूर्ण झाले आहे़ हिंमत असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे, असा पुरुच्चार करत भाजप-सेनेच्या भांडणामुळे प्रशासन कोलमडले असून कायदा-सुव्यवस्था नसलेले राज्य बनले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.