Breaking News

नगरपंचायतीच्या नाल्याची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

सातारा, दि. 20, फेब्रुवारी - वडूज-वाकेश्‍वर रस्तातेवाडी ओढ्याच्या पात्रानजीक नगरपंचायतीच्या नाल्याची दुरावस्था झाल्याने वडूजची सर्व गटारगंगा वाकेश्‍वर रस्त्यावर येत आहे. या पाण्यामुळे पाठीमागेही रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. ही बाब जागृत नागरिकांनी नगरपंचायतीचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अ धिका-यांच्या कानावर घातली. मात्र प्रशासनाकडून कसलीही हालचाल होत नाही. त्यामुळे जखम चिघळल्यानंतरच प्रशासनाच्या संवेदना जागृत होणार का असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज शहरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर सातेवाडी ओढ्याचे पात्र आहे. या ओढ्यात वडूजच्या गटरातून बस स्थानक परिसरातील सांडपाणी जाते. रस्त्याच्या उतारावर एका ठिकाणी मोरीची मोडतोड झाल्याने गटराचे पाणी रस्त्यावर येते. या पाण्यामुळे पाठीमागे दोन-तीन वेळा खड्डे पडले होते. त्यानंतर काही दिवसांनी नवीन रस्त्याच्या कामावेळी खड्यांची डागडुजी झाली. मात्र आता पुन्हा त्याच ठिकाणावरुन गटराचे पाणी वाहू लागले आहे. या पाण्यामुळे येणा-या-जाणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच उतारावर खड्डे पडू लागल्याने छोट्या-मोठ्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे चार दिवसात या पाण्याची मोरीतून विल्हेवाट लावली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायतीच्या सदस्या रोहिणी फडतरे, मंगल फडतरे, यांनी दिला आहे.
त्यांच्या खिशातून नुकसानभरपाई घेतली पाहिजे
गटराच्या पाण्याबाबत नगराध्यक्षांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी एका कर्मचा-यास तातडीने सूचना केली. मात्र राजेशाही थाटात वावरणा-या त्या कर्मचा-यांनी पदाधिका-यांच्या सुचनेस केराची टोपली दाखवली. अशा बेजबाबदार कर्मचा-यांच्या खिशातून सार्वजनिक संपत्तीची नुकसान भरपाई घेतल्याशिवाय त्यांना गांभीर्य लक्षात येणार नाही.