Breaking News

कुळधरण ग्रामविकास संघटनेचा शिवजयंती महोत्सव जल्लोषात संपन्न दै. लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे, विचारवंत अन्वर राजन, नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची प्रमुख उपस्थिती

कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने मंजुषा लॉन्स येथे आयोजित शिवजयंती महोत्सव जल्लोषात पार पडला. दै. लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्रा. किरण जगताप यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक उपक्रमांतून परिवर्तनाचे संदेश दिले जातात. लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत त्यांना वेठबिगारीने वागविले जात असल्याने जनजागृतीचे उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमात तालुकास्तरीय चित्र रंगवा, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्रासह विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, कर्जतचे तहसीलदार किरण सावंत, प्राचार्य चंद्रकांत मोरे, पं. स. सदस्य हेमंत मोरे, नगरसेवक लालासाहेब शेळके, यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन रवी पाटील, मा. सभापती डॉ. संदीप बोराटे, मा. उपसरपंच सतिश कळसकर, तात्यासाहेब घालमे, युक्रांदचे सहकार्यवाह आप्पा अनारसे, विजय प्रतिष्ठानच्या छत्रपती पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्रावण गिरी, कोपर्डीचे मा. सरपंच सतिष सुद्रिक, परीक्षक शरद जगताप, राजेंद्र माने, बारिकराव शिंदे, पत्रकार प्रा. सोमनाथ गोडसे, भाऊसाहेब वाडगे, समृद्ध कर्जतचे संपादक भाऊसाहेब तोरडमल, उपसंपादक भास्कर भैलुमे, उद्योजक भाऊसाहेब जंजिरे, पुण्याच्या शिवस्मित डेव्हलपर्सचे गोकुळ पवार, पिंटू पाटील, राजेंद्र परकाळे, कुमार कापसे, बाळासाहेब मुरकुटे, तात्यासाहेब ढवाण, नाथा पाटील, रवी भगत, पिनू दरेकर, संघटनेचे मार्गदर्शक शेषेराव सुपेकर, महादेव सुपेकर, महिला आघाडी अध्यक्षा वर्षाराणी सुपेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ विचारवंत अन्वर राजन, तहसीलदार किरण सावंत, सदगुरुचे संस्थापक शंकरराव नेवसे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, प्रा. सोमनाथ गोडसे, प्राचार्य श्रावण गिरी यांनी आपले विचार मांडलेे. प्रा. किरण जगताप यांनी सुत्रसंचालन तर माजी उपसरपंच सतिश कळसकर यांनी आभार मानले.

छत्रपतींचा इतिहास बदलविणार्‍यांविरुद्ध सामूहिक लढा देण्याची गरज : अशोक सोनवणेखरा इतिहास मोडीत काढत शिवजयंती तिथीनुसार साजरी करणारे समाजात डोके वर काढत आहेत. शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्याच्या मुद्द्यावर मराठा समाजाने 20 वर्षे संघर्ष केला. त्या अगोदरपासुन ओबीसी समाज सरकारबरोबर भांडत आला आहे. वाढदिवस, वर्षश्राद्ध, दहावा, तेरावा तारखेवर होतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार करण्याचा प्रयत्न होतो ? त्यांना विरोध करा. छत्रपतींचा इतिहास बदलून टाकणार्‍यांविरूध्द सामूहिक लढ्याची गरज आहे. शिवजयंती ही 19 फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे.
बहुजन समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सुधारत आहे. मात्र बहुजनांची मस्तक साफ करण्याची अजूनही गरज आहे. त्याचीच लढाई मी करतो. पुण्यातील कित्येक रस्त्यांना ब्राह्मणांचीच नावे आहेत. तेथे बहुजन राहत नव्हते का? असा सवाल संपादक सोनवणे यांनी उपस्थित केला. पाठ्यपुस्तकातुन छत्रपतींचा इतिहासही बदलला जात आहे. यावर आपल्याला विचारांची लढाई करायची आहे. या मुद्द्यांवर चिंतन होणे आवाश्यक आहे. त्याच्यावर वैचारिक बैठक व्हावी. ग्रामीण भागात लोकांची मस्तक चांगली राहण्यासाठी युवकांनी असेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम ठेवले तर परिवर्तन घडेल. मी वैचारिक परिवर्तनासाठी झटतो. जे बोलतो ते इतिहासाला धरुन बोलतो. जे बोलतो त्यावर माफी मागत नाही. अशी स्पष्टोक्ती देत संपादक अशोक सोनवणे यांनी परखड व चौफेर भाष्य केले.

आदर्श पुरस्कार आणि कर्तृत्ववान भूमिपुत्र सन्मान
संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या कर्जत तालुक्यातील पाच विभूतींना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी कृषीभूषण पुरस्कार चांदे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी, पत्रकारिता पुरस्कार दै. लोकमतचे तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र अनारसे, आदर्श अधिकारी पुरस्कार राजेंद्र सुपेकर, कर्जत विद्याभूषण पुरस्कार मिरजगावच्या संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव नेवसे तर आदर्श सामाजिकता पुरस्कार राशिनचे उद्योजक मेघराज बजाज यांना प्रदान करण्यात आला. शाल, फेटा, श्रीफळ, गौरवचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. एक्साईज इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल राम मारुती सुपेकर, दिल्ली येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विद्यार्थीनी सोनाली मंडलिक तसेच खोखोत राज्यपातळीवर निवड झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
समाजात एकोपा नांदण्यासाठी छत्रपतींच्या विचारांची गरज : नगराध्यक्ष नामदेव राऊत
समाजात एकोपा ठेवून शांतता प्रस्थापित करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारण्याची गरज आहे. सर्वांना सोबत घेवून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे मावळे सर्व जातीधर्माचे होते. त्यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक असल्याने आपण छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करत असल्याचे विचार कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी अध्यक्षस्थानाहून बोलताना व्यक्त केले.

180 रुग्णांकडून शिबिराचा लाभ
संघटनेने आयोजित केलेल्या नेत्रतपासणी शिबिरात 180 रुग्णांनी लाभ घेतला. याशिबीराचे उद्घाटन मोहन सुपेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यंकट आप्पा जगताप, कल्याण सुपेकर, सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन बापुराव सुपेकर, अरुण तांबे, आजिनाथ सुपेकर, साहेबराव सुपेकर, हनुमंत सुपेकर आदी उपस्थित होते. कुळधरण ग्रामविकास संघटनेचे बंटीराजे जगताप, रवींद्र जगताप, सुधीर जगताप, बंडू सुपेकर, मधुकर सुपेकर, अक्षय सुपेकर, सुनील सुपेकर, अतुल जगताप, संदीप जगताप, अक्षय ढवळे, सतीश सुपेकर, सागर सुपेकर, संभाजी जगताप आदींनी आयोजनात योगदान दिले.