Breaking News

अग्रलेख - बँकाची बुडीत व्यवस्था !


बँकानी आपला कारभार राजकीय दावणीला बांधल्यामुळे बँकाचा कारभार आता पारदर्शक असा राहीला नाही. त्यामुळेच एकामागून एक कर्जफावेगिरीचे घोळ समोर येत, बँक प्रशासनाचे पितळ उघडे पडले. बँकाना गंडा घालत हजारो कोटी रूपयांच्या फसवेगिरीमुळे बँक प्रशासन चर्चेत आले आहे. सर्वसामान्यांना लाख रूपये जरी कर्ज घ्यायचे असेल, तरी त्याला कागदांसाठी, शिफारसीसाठी खेटा मारायला लावणारे हेच बँक प्रशासन काही लाच स्वीकारत, कोणतीही खातरजमा न करता, अंडरटेकिंग देत होते, हे आता उघड झाले आहे. वास्तविक अंडरटेकिंग द्ारे आपल्या बँकाना गंडा घालण्यात येत आहे, हे न कळण्याएवढे बँक प्रशासन दुधखुळे नव्हते. मात्र राजकीय वजन वापरत, आणि बँकातील काही कर्मचार्‍यांना हाताशी धरत हजारो कोटी रूपयांना बँकाना गंडवण्यात आले. मागील तीन वर्षांपासून पंंजाब नशनॅल बँकेला गौरवण्यात येत आहे, मग हा घोटाळा तेव्हाच का उजेडात आला नाही, असे असंख्य प्रश्‍न आता निर्माण होवू लागले आहे. सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणणारे हेच बँक प्रशासन मात्र आर्थिक हितसंबध आणि राजकीय ओळखीमुळे कसे गंडवतात, याचे अनेक घोटाळे समोर येत आहे. अंडरटेकिंग म्हणजे काय? याचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, एखाद्या कंपनीला जर परदेशातून माल आयात करायचा आहे. मात्र ही आयात करण्यासाठी पैशाची गरज असते. ही पैशाची गरज देखील परकीय चलनामध्ये असावी लागते. अशावेळेस कुठलीही परदेशी बँक त्या व्यक्तीला कर्ज का देईल? कारण परदेशी बँक त्या व्यक्तीला ओळखत नसते. अशावेळेस मालाची आयात कशी करायची? यासाठी नीरव मोदी या व्यक्तीने नामी शक्कल लढविली. परदेशी बँक ओळखत नाही, म्हणून नीरव मोदी हा भारतीय बँकाकडे जावून लेटर ऑफ अंडरटेकिंग घ्यायचा. म्हणजेच परदेशातील मालाची किंमत अंडरटेकिंग द्ारे भारतीय बँका चुकवायच्या. यातील खरी गोम अशी आहे की, कोणतीही बँक अशाप्रकारे अंडरटेकिंग देत नाही. जर नीरव मोदी याला 500 कोटी रूपयांच्या मालाची निर्यात करायची असेल, तर त्यासाठी भारतीय बँकाकडून 500 कोटी रूपयांचे अंडरटेकिंग लागेल. मात्र असे अंडरटेकिंग देतांना नीरव मोदी यांच्याकडून त्या किमतीचा डिमांड ड्राफ्ट किंवा कोणती तरी संपत्ती बँकेकडे गहाण ठेवल्यासच अशी अंडरटेकिंग देता येऊ शकते. मात्र बँक प्रशासनाने आपल्याच नियमांना हरताळ फासत, नीरव मोदी याला आपल्या बँकाचे कुरण मोकळे गेले. त्यामुळे नीरव मोदी सहजपणे, 11 हजार कोटी रूपयांच्या वरपर्यंत अंडरटेकिंग घेत बँकेला बुडवत गेला. नीरव मोदी जरी बँकेच्या डोळयात धुळफेकत असला, तरी बँकेचे दरवर्षी होणारे आ ॅडिट, दक्षता पथक यांच्या भूमिकाविषयी देखील सांशकता निर्माण होते. नीरव मोदी यांचे देशातील महत्वाच्या राजकीय व्यक्तीसोबत असणारी उठबस आणि त्याचा वावर यामुळे क दाचित तीन वर्षांपासून हा घोटाळा सुप्तावस्थेत होता. नीरव मोदीचा घोटाळा समोर येत नाही, तोच रोटोमॅकचा 3 हजार 695 कोटी रूपयांचा घोटाळा उघड झाला. याआधीच विजयस मल्ल्या याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे हजारो कोटी रूपये बुडवून तो देशातून पळून गेला आहे. अशा अनेक घोटाळयामुळे बँक व्यवस्थाच धोक्यात येते की काय? अशी शंका आता निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच आता कडक पावले उचलत बँक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल क रण्याची गरज आहे. अन्यथा बँक व्यवस्था डबघाईस येण्यासाठी वेळ लागणार नाही.