Breaking News

अग्रलेख - गारपिटीच्या तडाख्याने शेतकर्‍यांची बिकट अवस्था

शेतकरी हा नेहमीच नागवला जातो, असे साधारणपणे म्हटले जाते. कारण ज्याप्रमाणे शासन, प्रशासन, व्यवस्था या शेतकर्‍यांची अवहेलना करतेच, तसाच तो निसर्ग, जो कधी भरभरून देतो, तोच कधी परत घेऊनही जातो. मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीमुळे शेतकरी पुरता कोलमडला असून, त्याच्या पुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. कर्जमाफी राज्यसरकारने जाहीर केली, मात्र संपूर्णत : शेतकर्‍यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, त्यातच गारपिटीचे नवीन संकट. शेतकर्‍यांने नेमके करावे काय? हातातों डाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला असेच म्हणावे लागेल. मागील वर्षांचा दुष्काळामुळे पुरते कंबरडे मोडलेला शेतकरी कुठेतरी या वर्षी सावरतांना दिसून येत होता. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे पीक पाणी ही जोरात होते, त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यांवर आनंद होता. मात्र तो आंनद देखील निसर्गाला पाहवेना म्हणून की काय, निसर्गाने आपला  प्रकोप दाखवत, संपूर्ण फळबागा उध्दवस्त केल्या. वर्षानुवर्षे निसर्गाच्या लहरीपणाचे चटके सोसणारा आमची शेतकरी या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात देखील किती सोसणार असा प्रश्‍न निर्माण होतो. शेतीक्षेत्रात आपण आजही किती मागासलेले आहे, याची यामुळे प्रचिती येते. कधी अवर्षण, दुष्काळाचे दाहक अनुभव तर कधी अवकाळी पावसाची गोठवून टाकणारी शेतकर्‍याचे विश्‍व उद्ध्वस्त करून जाते. त्याला अवघे जग भलेही ‘अन्नदाता’ वगैरे म्हणत असेल, पण त्याच्या या दु:खमय जगण्याची इतरांना, म्हणजे त्याच्या घरातील लोकांशिवाय इतर कोणालाच फिकीर नसते, त्यामुळे त्याच्या सार्‍या अडीअडचणींचा बोजा जेव्हा प्रत्येक हंगामात वाढत जातो, तस तसा हा ‘आधुनिक बळीराजा’ त्याच्या नकळत परिस्थितीच्या पायाखाली दाबला जात असतो, खोल, खोल. त्यातून लवकर सुटका व्हावी यासाठी कधी तो शेतातील झाडालाच घेतो गळफास किंवा भयानक उग्र दर्पाचे जहाल कीटकनाशक पिऊन विसावतो काळ्या आईच्या कुशीत. पण कर्जाचा भुजंग मात्र सोडत नाही विळखा. तो डसतो किडकिडीत असहाय विधवेला आणि उघडया-नागडया पोरांना. शेती आणि शेतकरी यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहणे, त्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे अशी आपल्या देशात पद्धतच नाही.
हवामान चांगले असेल तर पीक भरभरून येते, पण आपल्याकडे कोणत्याच कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्याची सोय नाही. बाजारात माल जास्त आला की भाव पडतो आणि दुष्काळ वा अवकाळी पावसाचा फटका बसला तर सगळा पैसा पाण्यात जातो. गारपिटीने राज्यातील द्राक्ष, ऊस, केळी, कांदा, टोमॅटो, हरभरा, गहू आदी पिके अक्षरश: जमीनदोस्त केली आहेत. परिणामी आधीच दुष्काळात पोळलेला आमचा बळीराजा गारांच्या मा-याने अर्धमेला झाला आहे. त्याला आर्थिक वा भावनिक सहानुभूती देणे तर दूर, कु णी त्याला साधी शाब्दिक सहानुभूतीही देताना दिसत नाही.. हे असेच होत राहिले, तर या एकेकाळी ‘शेतीप्रधान’ असणार्‍या देशातील शेतकर्‍यांची संख्या झपाटयाने घटेल. सध्या शेतकर्‍यांची पुढील पिढी शेतात पाय ठेवत नाही, मग पुढील 10 वर्षानी आमच्या शेतीची काय स्थिती होईल, याची कल्पनाही करता येत नाही. जर शेतकरीच जर असुरक्षित असेल तर अन्न उत्पादन वाढणार कसे? संपूर्ण देशाला साधारणत: 200 दशलक्ष टन अन्नधान्य पुरू शकते. वाढत्या लोकसंख्येमुळे त्याचेही प्रमाण वाढेलच, पण जर शेतकर्‍यांची पुढील पिढी शेतीपासून पूर्णपणे तुटली तर आम्ही पेट्रोल-डिझेलप्रमाणे गहू-तांदूळही आयात करणार की, ‘फार्महाउस’ घेऊन नावापुरते शेतकरी बनलेल्यांकडून अन्नधान्य उत्पादनाची अपेक्षा करणार? त्यामुळे कृषीक्षेत्राला पूर्णपणे उतरती कळा लागण्यापूर्वी त्याकडे लक्ष देऊन सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतीक्षेत्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही.